श्रीराम प्रतिष्ठान, मुरूम येथे वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न…….
उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
श्रीराम प्रतिष्ठान, मुरूम यांच्या वतीने इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित वादविवाद स्पर्धेचा विषय “सोशल मीडिया समाजाला जोडते का तोडते?” असा होता. या स्पर्धेत एकूण १२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून विषयाच्या दोन्ही बाजूंनी प्रभावी मांडणी केली. स्पर्धकांनी सोशल मीडियाचे सकारात्मक व नकारात्मक पैलू स्पष्ट करत सखोल विचार मांडले.
तसेच इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा विषय “मोबाईलच्या दुनियेत हरवलेले बालपण” असा होता. या स्पर्धेत ९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अति वापरामुळे बालपणावर होणारे परिणाम, बदलती जीवनशैली आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या यावर प्रभावी भाषणे सादर केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या कृतिशील विज्ञान शिक्षक सौ. सोनाली कलशेट्टी विराजमान होत्या. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. डॉ. हुलपळे सर, प्रा. महामुनी सर व भुरे सर यांनी काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या सादरीकरणाचे मूल्यमापन केले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री. संतोष येवले यांनी केले, तर प्रस्तावना व आभार प्रदर्शन प्रा. सतीश रामपुरे यांनी केले.
स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे :
वक्तृत्व स्पर्धा (इयत्ता ८ वी ते १० वी)
प्रथम : वर्षा अंबुसे
द्वितीय : वैशाली नागने
तृतीय : शहबाज नदाफ
वादविवाद स्पर्धा (इयत्ता ११ वी व १२ वी)
प्रथम : रुपनूर वैष्णवी संजय व सुरवसे ज्ञानेश्वरी संजय
द्वितीय : जाधव सोनाली अशोक व जाधव साक्षी चंद्रकांत
तृतीय : राठोड सीमा संजय व खजुरे तेजस्विनी उमेश
या स्पर्धा ज्ञानवर्धक व विचारप्रवर्तक ठरल्या. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला व विचारशक्तीला वाव देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, विचारमंथनाची सवय आणि व्यक्त होण्याची कला विकसित होण्यास मोठी मदत होते, असे मत अध्यक्ष व परीक्षकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. सिद्धलिंग हिरेमठ, श्री. संतोष येवले, श्री. राजकुमार हिरेमठ, श्री. प्रशांत सोमवसे, श्री. विकास शिंदे, रोहित स्वामी व सौ. शोभा बेगमपुरे यांनी परिश्रम घेतले.






