उज्वला किराणा दुकानाचा कामगारच निघाला दरोड्याचा मास्टरमाईंड ; स्थानिक गुन्हे शाखेने दोन तासांत उघड केला कट !
तुळजापूर प्रतिनिधी -:
सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर दाळींब येथे झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या दुकानातून फिर्यादीने मालाचे पैसे वसूल केले, त्याच दुकानातील एका १९ वर्षीय कामगाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा दरोड्याचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
दिनांक २८ मार्च २०२६ रोजी फिर्यादी हृषिकेश जाधव (रा. लातूर) हे मुरूम येथील ‘उज्वला किराणा’ दुकानात माल उतरवून त्याचे १,१४,००० रुपये रोख घेऊन आपल्या वाहनाने परतत होते. सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर दाळींब फाट्याजवळ ६ ते ७ अनोळखी इसमांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या चालकाला गाडीतून उतरवून बेदम मारहाण केली आणि त्यांच्याजवळील रोख रक्कम लुटून नेली होती. याप्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७७/२०२६ अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली.
मुख्य आरोपी अभिषेक राजेंद्र कावडे (वय १९) हा त्याच किराणा दुकानात काम करत होता, जिथे फिर्यादीने माल उतरवला होता.
फिर्यादीकडे मोठी रक्कम असल्याचे पाहून त्याने आपल्या साथीदारांना माहिती दिली आणि लुटमारीचा प्लॅन आखला.
आरोपींनी दुचाकी आणि एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून फिर्यादीच्या गाडीचा पाठलाग करून दरोडा टाकला.
पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे:
१. अभिषेक राजेंद्र कावडे (वय १९, रा. कंटेकूर)
२. दत्ता व्यंकट जमादार (वय ३३, रा. कंटेकूर)
त्यांच्याकडून दरोड्यातील हिस्स्याचे २०,००० रुपये रोख आणि दोन मोबाईल असा एकूण ४२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील इतर ६ साथीदार सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सदर कारवाईचा दोन तासात छडा लावल्याने धाराशिव पोलिसांप्रती नागरिकांचा विश्वास अजूनच दृढ होत चाललेला आहे.






