महामार्गावर धावत्या वाहनातून माल लांबवणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची २४ तासांत धडाकेबाज कारवाई!
तुळजापूर प्रतिनिधी: जागतिक तेल युद्धाच्या काळात भुरट्या चोरांचा खाद्य तेलावर डल्ला मारण्याचा प्रयत्न . महामार्गावर धावत्या वाहनांतून मालाची चोरी करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट झालेला असतानाच, धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवून एका टोळीला अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. इंदापूर ते वाशी रोडवर चालत्या पिकअपमधून तेलाचे डबे चोरणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.
धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संतोष राजेंद्र शिंदे (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) याने आपल्या साथीदारांसह इंदापूर ते वाशी रोडवर एका धावत्या पिकअपमधून तेलाचे डबे चोरले असून ते त्याच्या घरी लपवून ठेवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ सापळा रचला. संशयित आरोपी संतोष शिंदे हा येरमाळा येथे मिळून आला. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
ताब्यात घेतलेले आरोपी:
१. संतोष राजेंद्र शिंदे (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा)
२. पापा शंकर पवार (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा)
३. आकाश देवीदास शिंदे (रा. पारा)
आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेले ४ तेलाचे डबे (किंमत ८,९६० रुपये) आणि गुन्ह्यात वापरलेली ६३,९६० रुपये किमतीची टीव्हीएस रेडिऑन कंपनीची मोटारसायकल (चेसी नं. MD625BK627MIA01176) असा एकूण ७२,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वाशी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर आणि चालक पोलीस अंमलदार रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईबद्दल धाराशिव पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. नागरिकांनीही सतर्क राहून अनुसूचित प्रकारात दिसताच पोलिसांची मदत घेण्याची गरज आहे.






