Best News Portal Development Company In India

डोंबिवलीतील रखडलेली वाहतूक कोंडी आणि लोकलच्या समस्येवर उद्योजक अश्विन केळकर आक्रमक!

डोंबिवलीतील रखडलेली वाहतूक कोंडी आणि लोकलच्या समस्येवर उद्योजक अश्विन केळकर आक्रमक

डोंबिवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले होते, मात्र या आवाहनाला प्रतिसाद देणे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आणि डोंबिवलीकरांसाठी किती वेदनादायी ठरू शकते, याचा संतापजनक अनुभव ‘अवनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीस’चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (उद्योग विभाग) मुंबई विभाग अध्यक्ष श्री. अश्विन हेमंतकुमार केळकर यांनी व्यक्त केला आहे.
लोकल प्रवासाचा ‘जीवघेणा’ अनुभव:
पंतप्रधानांच्या आवाहनाचा मान राखून श्री. केळकर यांनी स्वतःच्या खाजगी गाडीऐवजी लोकलने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, डोंबिवली ते मुंबई या प्रवासात त्यांना प्रचंड गर्दी आणि नियोजनाच्या अभावाचा सामना करावा लागला. “डोंबिवलीतून नवीन लोकल सोडण्याच्या घोषणा गेल्या अनेक वर्षांपासून फक्त कागदावरच आहेत, प्रत्यक्षात मात्र रोज तांत्रिक बिघाड आणि जीवघेणी गर्दी प्रवाशांच्या पाचवीला पुजलेली आहे,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.
रस्त्यांवरील खड्डे आणि विनाकारण खोदाईचा फटका:
रेल्वेच्या त्रासानंतर बसने प्रवास करण्याचा प्रयत्न केला असता, रस्त्यांवरील विनाकारण केलेल्या खोदाईमुळे वाहतुकीचा बोजवारा उडालेला पाहायला मिळाला. ज्या प्रवासासाठी गाडीने साधारण १ तास लागतो, तिथे २ ते ३ तास वाया गेले. याचा थेट परिणाम त्यांच्या व्यावसायिक कामावर झाला असून महत्त्वाची मीटिंग आणि कामे रद्द करावी लागली. या आर्थिक आणि मानसिक त्रासाला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.
लोकप्रतिनिधींना थेट आव्हान:
या परिस्थितीवर संताप व्यक्त करताना अश्विन केळकर म्हणाले की, “सत्ताधारी पक्षाचे नेते फक्त घोषणाबाजी आणि ‘नाटकं’ करतात. बुलेट ट्रेनच्या गप्पा मारण्यापेक्षा त्यांनी एकदा सर्वसामान्यांप्रमाणे एसटी आणि लोकलने प्रवास करून दाखवावा, तेव्हाच त्यांना जनतेच्या वेदना समजतील.”
केळकर यांनी केलेल्या मुख्य मागण्या:

मोदीजी, केवळ आवाहन न करता सार्वजनिक प्रवासासाठी लोकल गाड्यांच्या फेऱ्या तातडीने वाढवा.

डोंबिवलीतून सुटणाऱ्या लोकलचे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करा.

रस्त्यांची विनाकारण खोदाई थांबवून वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करा.

“नेत्यांनी चालत जा किंवा बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवण्यापेक्षा जमिनीवर येऊन सर्वसामान्यांच्या प्रवासाची सोय करावी,” असे आवाहनही अश्विन हेमंतकुमार केळकर यांनी यावेळी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india