*सहानुभूतीच्या शिखरावरून उदासीनतेच्या गर्तेत : उमरगा-लोहारा शिवसेना (उबाठा)ची राजकीय अधोगती आणि हरवलेले कार्यकर्ते*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
राजकारणात पराभव हा नेहमीच मतांच्या आकड्यांनी होत नाही. अनेकदा पक्षांचा पराभव आधी कार्यकर्त्यांच्या मनात होतो आणि नंतर मतदान यंत्रांमध्ये दिसून येतो. कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील चमक हरवते, बैठकींमधील उत्साह ओसरतो, घोषणा निर्जीव होतात आणि “आपला पक्ष” ही भावना हळूहळू “त्यांचा पक्ष” बनते. ज्या दिवशी पक्ष आणि कार्यकर्ता यांच्यातील भावनिक नाळ तुटते, त्या दिवशी राजकीय अधोगतीची प्रक्रिया सुरू झालेली असते.
आज उमरगा-लोहारा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची जी अवस्था दिसत आहे, ती केवळ संघटनात्मक अपयशाची कथा नाही; ती अतिआत्मविश्वास, चुकीची निर्णयप्रक्रिया, कार्यकर्त्यांकडे केलेले दुर्लक्ष, स्थानिक नेतृत्वातील संकुचित गटबाजी आणि राजकीय वास्तव न समजण्याच्या वृत्तीची शोकांतिका आहे.
एक काळ असा होता की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबद्दल महाराष्ट्रात प्रचंड सहानुभूती निर्माण झाली होती. भाजपसोबतची युती तुटली, महाविकास आघाडीचा प्रयोग झाला, आणि अनेक नाट्यमय घडामोडींनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण या सत्ताकाळानंतर महाराष्ट्राने भारतीय राजकारणातील एक अभूतपूर्व घटना पाहिली. शिवसेना पक्ष फुटला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य आमदारांनी बंड केले. “गद्दार विरुद्ध निष्ठावान” अशी भावनिक लढाई उभी राहिली.
या लढाईत धाराशिव जिल्ह्यातील अनेक नेते शिंदे गटात गेले. तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुले यांच्यासारखी नावे तिकडे गेली. “कालही, आजही, उद्याही उद्धव ठाकरे यांच्यासोबत” अशी गर्जना करणारे माजी खासदार रवींद्र गायकवाडदेखील अखेर शिंदे गटात दाखल झाले. या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्या निष्ठेचे राज्यभर कौतुक झाले. जनतेत भावनिक लाट निर्माण झाली.
लोकसभा निवडणुकीत या सहानुभूतीच्या लाटेने परिणामही दाखवला. धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर यांना अभूतपूर्व यश मिळाले. उमरगा-लोहारा भागात “इथे माझाच फतवा चालतो” म्हणणाऱ्या राजकीय अहंकारालाच जनतेने धक्का दिला. दलित, मुस्लिम, संविधानवादी मतदारांनी भाजपविरोधी भावना मनात ठेवून मोठ्या प्रमाणावर मतदान केले. मोदी-शहा प्रणित केंद्रीकृत सत्ताकारणाबद्दलचा असंतोष, संविधान बदलाच्या भीतीची भावना आणि विरोधकांबद्दल निर्माण झालेली सहानुभूती या सर्वांचा लाभ महाविकास आघाडीला झाला.
मात्र राजकारणात सहानुभूती कायमस्वरूपी नसते. ती तात्पुरती असते. तिचे संघटनेत, विचारात, संघर्षात आणि संवादात रूपांतर केले नाही, तर ती लाट ओसरते. उमरगा-लोहारा भागात नेमके हेच घडले.
विधानसभा निवडणुकीत ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झाला आणि प्रवीण स्वामी यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. पण हा विजय केवळ त्यांच्या वैयक्तिक करिष्म्याचा नव्हता. जनतेत निर्माण झालेली नाराजी, काही प्रस्थापितांविरोधातील रोष, स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी उभा केलेला जनमताचा दबाव, जातीय समीकरणे, महायुतीतील अंतर्गत नाराजी या अनेक कारणांनी तो विजय घडला होता.
पण अनेकदा निवडणूक जिंकणारे नेते हे विजयामागील खरे सामाजिक आणि राजकीय कारण समजून घेत नाहीत. त्यांना वाटते की हा विजय पूर्णपणे “आपल्या” कर्तृत्वाचा आहे. इथूनच अधोगतीची सुरुवात होते.
उमरगा-लोहारा भागात विधानसभा विजयानंतर शिवसेना (उबाठा) नेतृत्वाने “एकला चलो रे” प्रकारचा कारभार सुरू केला. निवडणुकीत रक्त आटवणारे कार्यकर्ते, पक्षासाठी शत्रुत्व पत्करणारे लोक, सामाजिक पातळीवर संघर्ष करणारे कार्यकर्ते हळूहळू बाजूला पडले. निर्णयप्रक्रिया काही मोजक्या लोकांच्या हातात केंद्रीत झाली. “लढायला सगळे आणि कारभार करायला मोजकेच” अशी भावना वाढू लागली.
कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर सर्वात मोठा आघात तेव्हा झाला, जेव्हा निवडणुकीत “गद्दार” म्हणून हल्लाबोल केलेल्या नेत्यांचेच औक्षण, सत्कार आणि अतिशबाजी करण्यात आली. निवडणुकीत ज्यांच्याविरोधात द्वेष, संघर्ष आणि भावनिक लढाई उभी केली, त्यांच्यासोबत निवडणुकीनंतर हसतखेळत फोटोसेशन होत असेल, तर तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होणारच. “आम्ही कोणासाठी भांडलो?” हा प्रश्न जेव्हा कार्यकर्त्यांच्या मनात उभा राहतो, तेव्हा पक्षाची उर्जा मरायला लागते.
याहून गंभीर बाब म्हणजे महाविकास आघाडीतील नैसर्गिक मित्र पक्ष आणि सामाजिक घटक हळूहळू दूर गेले. काँग्रेस नाराज झाली. राष्ट्रवादीने स्वतंत्र भूमिका घेतली. वंचित बहुजन आघाडीसोबत समाधानकारक संवाद घडू शकला नाही. स्थानिक सामाजिक संघटना आणि समविचारी कार्यकर्ते दुर्लक्षित झाले.
नगर परिषद निवडणूक हा या सगळ्याचा टर्निंग पॉइंट ठरला. काँग्रेसचा अध्यक्षपदावरील दावा रास्त असूनही त्याला आवश्यक ती राजकीय संवेदनशीलता दाखवली गेली नाही. “मोठा भाऊ” वृत्तीने चर्चेत लवचिकता गमावली. परिणामी काँग्रेसने शिंदे सेनेसोबत युती केली. राष्ट्रवादी वेगळी गेली. वंचितसोबत संवाद अपुरा राहिला. आणि शिवसेना (उबाठा)चा अक्षरशः सुपडा साफ झाला.
ही केवळ निवडणूक हार नव्हती; हा राजकीय वास्तवाचा इशारा होता.
पण दुर्दैव म्हणजे एवढ्या मोठ्या धक्क्यानंतरदेखील पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने आत्मपरीक्षण केले नाही. आज उमरगा तालुकाध्यक्ष पद रिक्त आहे. शहराध्यक्ष पद रिक्त आहे. अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. तडफदार, संघर्षशील तरुण कार्यकर्त्यांना निर्णयप्रक्रियेत स्थान नाही. बैठका नाहीत. संवाद नाही. संघटन विस्तार नाही. जिल्हाध्यक्ष तथा आमदार म्हणून अपेक्षित असलेली पक्षबांधणी दिसत नाही. खासदार इतर कामांमध्ये व्यस्त असल्याने स्थानिक संघटनात्मक पोकळी अधिकच वाढली आहे.
राजकारणात रिकामी जागा कधीच रिकामी राहत नाही. शिवसेना (उबाठा)ने निर्माण केलेल्या पोकळीत आता नवे समीकरण आकार घेत आहे. काँग्रेस आणि शिंदे सेनेतील स्थानिक समीकरणे, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पातळीवरील नव्या घडामोडी हे सगळे भविष्यातील राजकारण बदलू शकते.
सर्वात मोठा प्रश्न मात्र संघटनात्मक नसून मानसिक आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास तुटत चालला आहे. पक्षासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आज निराशा, संताप आणि उदासीनता वाढताना दिसत आहे. एका कार्यकर्त्याने विद्यमान आमदारांना शिवीगाळ करण्यापर्यंत परिस्थिती पोहोचते, याचा अर्थ केवळ वैयक्तिक नाराजी नाही; ती खोल राजकीय अस्वस्थता आहे.
आज या भागातील शिवसेना (उबाठा)ची अवस्था पाहिली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की सहानुभूतीच्या लाटेवर उभे राहून पक्ष फार काळ टिकत नाहीत. त्यासाठी विचार, संघर्ष, संवाद, समन्वय, आत्मपरीक्षण आणि कार्यकर्त्यांचा सन्मान आवश्यक असतो.
राजकारणात “आपल्याशिवाय कुणाचे चालत नाही” हा अहंकार अत्यंत घातक असतो. कारण जनता आणि कार्यकर्ता हे दोघेही कायमस्वरूपी कुणाचे गुलाम नसतात. ते भावना देतात, साथ देतात, पण दुर्लक्ष झाले की दूरही जातात.
उमरगा-लोहारा भागात आज शिवसेना (उबाठा)समोरचा सर्वात मोठा प्रश्न भाजप, शिंदे सेना किंवा विरोधक नाहीत; सर्वात मोठा प्रश्न म्हणजे स्वतःच्या चुका ओळखण्याची तयारी आहे का? कार्यकर्त्यांशी पुन्हा भावनिक नाळ जोडण्याची क्षमता आहे का? “एकला चलो” मानसिकता सोडून समन्वय, संवाद आणि सर्वसमावेशक राजकारण करण्याची इच्छाशक्ती आहे का?
कारण इतिहास सांगतो की जनतेकडून मिळालेली सहानुभूती गमावणे हे जितके सोपे असते, तितकेच ती पुन्हा मिळवणे कठीण असते.
© ऍड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)






