शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक; १० जूनला तुळजापुरात ‘रास्ता रोको’ आंदोलन!
तुळजापूर प्रतिनिधी :- शेतकरी राजाच्या विविध मागण्यासाठी तुळजापूर मध्ये शेतकरी संघटना आक्रमक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. येत्या बुधवार, दिनांक १० जून २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता तुळजापूर येथील जुने बसस्थानक समोर भव्य ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष श्री. रविंद्र भिमाशंकर इंगळे यांनी दिला आहे. यासंदर्भातील लेखी निवेदन आज तुळजापूरचे मा. तहसीलदार साहेब यांना सादर करण्यात आले.
प्रमुख मागण्या-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनात प्रामुख्याने खालील ५ मागण्यांवर भर दिला आहे:
१. बियाणे व खते: महाबीज किंवा राष्ट्रीय बियाणे महामंडळामार्फत प्रमाणित आणि सुधारित वाणांचे बियाणे अनुदान तत्त्वावर तातडीने उपलब्ध करून द्यावे. तसेच युरिया, DAP, पोटॅश यांसारख्या रासायनिक खतांचा पुरेसा साठा कृषी केंद्रांवर उपलब्ध करून देत काळाबाजार रोखावा.
२. पीक कर्ज व विमा: सर्व शेतकऱ्यांची विनाअट कर्जमाफी करण्यात यावी. तसेच चालू हंगामासाठी शेतकऱ्यांना ०% व्याजदराने पीक कर्ज मंजूर करून त्याचे तात्काळ वाटप सुरू करावे.
३. सिंचन व वीज पुरवठा: रब्बी हंगामासाठी कालव्यांचे आवर्तन वेळेवर सोडण्यात यावे आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंगल फेज २४ तास अखंड वीज पुरवठा करावा.
४. कृषी विभागामार्फत गावपातळीवर रब्बी पीक नियोजन, कीड-रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत व हवामानावर आधारित सल्ला SMS द्वारे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावा.
५. बाजार व हमीभाव: हमीभाव केंद्रे हंगाम सुरू होण्यापूर्वीच सुरू करण्यात यावीत. खरेदी प्रक्रिया सुलभ करून माल खरेदी केल्यापासून ७२ तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात यावी.
अन्यथा तीव्र आंदोलन!
”रब्बी हंगाम यशस्वी होण्यासाठी या सर्व सुविधा शेतकऱ्यांना वेळेत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या सुविधा न मिळाल्यास उत्पादनात घट होऊन शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडेल. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ संबंधित विभागांना आदेश द्यावेत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल,” असा इशारा जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती माहितीसाठी मा. पोलीस निरीक्षक साहेब, पोलीस ठाणे तुळजापूर यांनाही सादर करण्यात आल्या असून, प्रशासनाने याची वेळीच दखल न घेतल्यास कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सदरील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांची दखल प्रशासन कितपत घेते याकडे सर्व शेतकऱ्यांचे आणि तुळजापूर वाशी यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.







