विधानपरिषद निवडणुकीसाठी उमरग्यात शांततेत मतदान!
उमरगा शहर प्रतिनिधी : बीड-धाराशिव-लातूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी गुरुवारी उमरगा तहसील कार्यालय येथे मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावत आपला मतदानाचा हक्क बजावला.
उमरगा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या मतदारांसाठी तहसील कार्यालय येथे मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान प्रक्रियेदरम्यान प्रशासनाने आवश्यक सुरक्षा व्यवस्था, मतदान कक्ष, ओळख पडताळणी तसेच इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे मतदान सुरळीतपणे पार पडले. या मतदान केंद्रावर मतदारांची एकूण संख्या 62 होती यामध्ये 33 पुरुष तर 29 महिला आहेत. त्यात महायुतीचे 52 तर महाविकास आघाडीचे दहा मतदार होते. दुपारी एक वाजेपर्यंत 27 मतदान झाले होते , साडे तीन वाजता शंभर टक्के मतदान पूर्ण झाले. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी मतदान केंद्राची पाहणी केली व मतदान केले.
यावेळी एकूण 62 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी, तहसील प्रशासन तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.मतदानासाठी आलेल्या मतदारांमध्ये नगरपरिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य सहभागी झाले होते. सकाळपासूनच आमदार प्रवीण स्वामी व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदान केंद्र परिसरात उपस्थित राहून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.दरम्यान, या निवडणुकीकडे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष मतमोजणी व निकालाकडे लागले आहे. महाविकास आघाडीचे महेश देशमुख व महायुतीचे बसवराज पाटील हे दोन्ही उमेदवार स्थानिकचे असल्याने वयक्तिक संबंधावर काही मतदार आपल्याकडे वळवून घेण्यात यशस्वी झाले तर लढत चुरशीची होऊ शकते. उमरगा तालुक्यातील मतदान शांततेत व कोणताही अडथळा न येता पूर्ण झाल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले.








