Best News Portal Development Company In India

मराठवाड्यातील वारंवार पडणारा दुष्काळ आणि उपाय योजना!

*मराठवाड्यातील वारंवार पडणारा दुष्काळ आणि उपाय योजना*

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
चिंतन: *भूमिपुत्र वाघ*

महाराष्ट्रातील मराठवाडा हा दुष्काळग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे दर दोन ते तीन वर्षांनी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. अनियमित पाऊस, भूजल पातळीतील घट, जंगलतोड, अपुरी जलसंधारण व्यवस्था आणि हवामान बदल यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडतो. दुष्काळामुळे शेतीचे उत्पादन घटते, जनावरांसाठी चारा उपलब्ध होत नाही आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे सरकारने दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
आता आपण दुष्काळाची कारणे शोधताना मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. पडणारा पाऊसही कमी दिवसांत आणि जोरदार स्वरूपात पडत असल्याने त्याचे पाणी वाहून जाते. जलसाठे, तलाव आणि विहिरी पुरेशा प्रमाणात भरत नाहीत. तसेच पाण्याचा अतिरेकी वापर, ऊसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड आणि जंगलांचे कमी झालेले क्षेत्र यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढते. खरंतर दुष्काळ निवारण्यासाठी वृक्ष लागवड संवर्धन काळाची गरज आहे.नेमकं तेच वृक्ष धन संपलं तर पडणारं पाणी थेट माती वाहून घेऊन जातं.पृथ्वीच्या जलसाठ्यामध्ये वाढ होण्यासाठी मूळ जंगल गवत याची खूप आवश्यकता असते. पडणारा पावसाचा थेंब झाडावरती गवतावरती पडतो त्या नंतर त्याच्या मुळाद्वारे पृथ्वी मध्ये थेट मुरला जातो.यातून जलसाठ्याची निर्मिती होते. भरपूर वृक्ष असल्याने पृथ्वीवर येणारी सूर्याची किरणे ही झाडावरती येऊन थांबतात यातून तापमान रोखण्यासाठी मदत होते. झाडांच्या पानांमुळे ऑक्सिजन निर्माण होतो आणि वातावरणामध्ये थंडावा टिकून राहण्यास मदत होते. झाडच जतन केली नाहीत तर सूर्य किरने थेट पृथ्वीवरती उष्णता फेकतात.त्याने पृथ्वी गरम होते वातावरनात गर्मी निर्माण होते.मग ऑक्सिजन निर्माण होणार नाही. कार्बन डाय-ऑक्साइड निर्माण होईल. पृथ्वीवरल्या मातीची धूप होऊन पावसासोबत माती वाहून जाईल. पृथ्वीतला पाणीसाठा संपेल आणि एक दिवस पाण्यासाठी जीव मरून जातील.हे दिवस जवळ येत आहेत. त्या आधीच सावरणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रदूषण थांबवावं लागेल. झाडे लावावी लागतील. त्याचं संवर्धन करावे लागेल. नदीकाठ ओढे परिपूर्ण भरभरून झाडे लावावी लागतील त्याचं संवर्धन करावे लागेल. म्हणजे पावसाचं पडणार पाणी थेट वाहून जाणार नाही. माती वाहून जाणार नाही. मातीच संरक्षण होईल. निथळ पाणी पाहायला मिळेल.
हे कितीतरी संशोधक आणि अभ्यासकांनी सांगितलं. परंतु ना माणूस विचार करतोय. ना सरकार विचार करते. या परिस्थितीत बदल हवे असतील तर प्रत्येक माणसानं वृक्ष लागवड आणि संवर्धनावरतीच काम करावे लागेल. जलस्त्रोत संरक्षण करणे.पाण्याचा योग्य वापर करणे.उसासारखी पिके घेणे बंद करणे. तरच भविष्यकाळ आपल्यासाठी निसर्ग मदतीला धावणार आहे.अन्यथा येणारे दिवस भयानक असतील याचे प्रत्येक माणसाने चिंतन करणे गरजेचे आहे.
*जलनायक मधुकर धस* सारखं म्हणायचे *पाऊस आला दुष्काळाच्या कामाला लागा* तो विचार ती भावना आज प्रत्येक माणसाने ध्यानात घेऊन येणाऱ्या काळाला समर्थपणे रोखण्यासाठी आजच काम करावे लागेल.

लोक आणि सरकार यांनी करावयाच्या उपाय योजना
१. जलसंधारणावर भर
गावोगावी शेततळी, नाला खोलीकरण, सिमेंट बंधारे, माती बंधारे आणि पाझर तलाव यांची निर्मिती करावी. पावसाचे प्रत्येक थेंब अडविण्याचे धोरण राबवावे.
२. नदीजोड व पाणी पुनर्भरण
नद्यांचे खोलीकरण करून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवावे. भूजल पुनर्भरणासाठी विशेष मोहिमा राबवाव्यात.
३. पीक पद्धतीत बदल
शेतकऱ्यांना कमी पाणी लागणाऱ्या ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा आणि तेलबिया पिकांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान वाढवावे.
४. वृक्षारोपण व वनसंवर्धन
मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे. जंगलांचे क्षेत्र वाढल्यास पावसाचे प्रमाण आणि भूजल साठे सुधारण्यास मदत होते.
५. शेतकरी विमा व आर्थिक मदत
पीक विमा योजना अधिक प्रभावी करावी. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आणि पारदर्शक आर्थिक मदत मिळावी.
६. रोजगार हमी योजना
दुष्काळी काळात ग्रामीण भागात रोजगार हमी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. जलसंधारणाच्या कामांमधून रोजगार आणि विकास दोन्ही साधता येतील.
७. जनजागृती आणि प्रशिक्षण
पाणी बचत, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि हवामानानुसार शेती याबाबत शेतकऱ्यांना नियमित प्रशिक्षण द्यावं लागेल.
८. सर्व बोडके डोंगर, दऱ्या, नद्या, खोरे ओढे यापासून शंभर दोनशे मीटर अंतर संरक्षित जंगल म्हणून ते ताब्यात घ्यावं लागेल. उघड्या बोडक्या डोंगरावरती दाट जंगल निर्माण करावा लागेल आणि ते त्याचं संरक्षण करावं लागेल असे मत समाज विकास संस्थेचे भुमिपुत्र वाघ यांनी आपल्या शब्दांकनातुन मांडणी केले आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india