Best News Portal Development Company In India

जनमताचा विजय की जनादेशाचा विश्वासघात?

*जनमताचा विजय की जनादेशाचा विश्वासघात?*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी “मी अद्याप शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जाऊन लोकांशी चर्चा करून निर्णय घेईन” असे माध्यमांसमोर म्हटले आहे.

खरं तर गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर आणि जनमानसात उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया पाहता जनमत काय आहे, हे स्पष्टपणे समोर आलेले आहे. त्यामुळे आता “चर्चा करतो, विचार करतो” अशा विधानांनी अधिक संदिग्धता निर्माण करण्यात फारसा अर्थ दिसत नाही.

लोकशाहीत जनता फक्त मतदानाच्या दिवशीच आपले मत व्यक्त करत नाही. जनतेचा संघटित आवाज, सामाजिक माध्यमांवरील भूमिका, सार्वजनिक दबाव आणि जागरूक नागरिकांची प्रतिक्रिया यांमधूनही राजकीय निर्णयांवर प्रभाव पडू शकतो. जर जनतेच्या भावना लक्षात घेऊन ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे सेनेत जाण्याचा विचार मागे घेतला, तर तो कोणाच्या पराभवाचा नव्हे तर लोकमताच्या विजयाचा क्षण ठरेल.

“सुबह का भूला शाम को घर वापस आ जाये तो उसे भूला नहीं कहते” अशी एक हिंदी म्हण आहे. त्यानुसार एखादी चूक वेळेत सुधारली गेली, तर समाज ती समजून घेण्याची उदारता दाखवतो. त्यामुळे असा निर्णय मागे घेतल्यास ओमराजे यांना स्वीकारले जाईल, यात शंका नाही.

मात्र त्याचवेळी “ऐसे किस्सों को भुलाया नहीं जाना चाहिए” हेही तितकेच खरे आहे. कारण लोकशाहीत स्मरणशक्तीही महत्त्वाची असते. भविष्यात अशा भूलथापांना बळी पडायचे नाही, प्रत्येक राजकीय घडामोडीकडे सजगपणे पाहायचे आणि नेत्यांना जनमताची जाणीव करून द्यायची, हेही नागरिकांनी ठरवले पाहिजे.

परंतु जर ओमराजे निंबाळकर यांनी अखेरीस शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला, तर त्यांच्या निवडणुकीत रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या, वेळ, पैसा आणि श्रम खर्च करणाऱ्या कार्यकर्ते व समर्थकांना त्यांच्याकडे जाब विचारण्याचा पूर्ण नैतिक अधिकार असेल. जनतेच्या विश्वासावर निवडून येऊन जनतेच्या भावनांच्या विरोधात निर्णय घेतला, तर लोकांनी त्याचा जाहीर निषेध करावा, राजकीय हिशेब मागावा आणि भविष्यात अशा निर्णयांना मतपेटीतून उत्तर द्यावे. कारण लोकशाहीत मतदार हा फक्त मत देणारा नसतो; तो लोकप्रतिनिधीचा खरा मालक असतो.

लोकशाही केवळ मतपेटीत जगत नाही; ती जागरूक, प्रश्न विचारणाऱ्या, भूमिका घेणाऱ्या आणि सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही जाब विचारणाऱ्या जनतेमुळे जिवंत राहते. जनमताचा आदर करणाऱ्यांना जनता डोक्यावर घेते; जनादेशाचा विश्वासघात करणाऱ्यांचा हिशेबही तीच ठेवते.

© ऍड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india