*वटसावित्रीची पौर्णिमा साजरी करताना*
*लेखक:-भूमिपुत्र वाघ.*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
आपला भारत विविधतेने नटलेला,थटलेला आहे.इथल्या भाषा, इथली संस्कृती,इथले लोक,इथला समाज, इथल्या जाती, इथली माती इथली नातीगोती खूप वेगळेपण जपत जपत ही संस्कृती पुढे पुढे चालत आहे.
वटसावित्री पौर्णिमा या सणाचे निमित्ताने आपण थोडे चिंतन करणार आहोत. वटसावित्री पौर्णिमा भारतभर हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.सौभाग्यवती महिला ह्या सणात सहभागी होतात. त्याच वेळेला ज्यांचे पती वारले आहेत त्या विधवा महिलांची दिवसभर घुसमट होताना आम्ही सगळे जण पाहत असतो.
आणि या दुःखाचा सरावही करून घेत असतो *नव्याने विधवा झालेल्या महिलांच्या मनाची काय स्थिती होत असेल याचा अंदाज तरी आम्ही करतो काय??*
सत्यवानाच्या मृत्यूनंतर त्याला वाचवीण्यासाठी केलेली तपश्चर्या आणि देवाने दिलेला आशीर्वाद यामुळे सत्यवानाला जीवदान मिळालं….. वास्तविकता हे ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी खूप चांगले आहे.परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार केल्यानंतर माणूस जेव्हा मरतो, तेव्हा तो पुन्हा कधीच जिवंत होत नाही. आणि असं कधीच घडत नाही. आज तरी विज्ञानानी हे सिद्ध केलेल आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये जे जे सन अंधश्रद्धा पसरविण्यासाठी काम करतात ते ते सण बहुजन समाजातल्या लोकांनी नाकारले पाहिजे.त्याची सुरुवात आम्हीच करायला हवी.
*आम्ही सण का साजरा करतो* सना दिवशी सर्वांना गोड धोड खाता यावं, आनंदित राहता यावं.आनंद उत्सव साजरा करता यावा. यासाठी सण साजरा करीत असतो. पण हा सण घरातल्या विधवांना दिवसभर अस्वस्थ करणारा, दुःखाच्या डोंगरात लोटणारा, बुजून गेलेल्या दुःखाच्या आठवणींचा अंगार फुलविनारा आहे. तर सौभाग्यवतीना आनंद देणारा आहे.असे *सुख आणि दुःख याचं समीकरण असणारा सन आमच्या घरात कसा साजरा होऊ शकतो?* ज्या सणाच्या भोवताली अंधश्रद्धेचा डोलारा उभा आहे.एका बाजूला एका महिलेला आनंद तर दुसऱ्या महिलेला दुःख देणारा.असे सण असतील तर ते हळूहळू कालबाह्य ठरवावे लागतील. त्याची सुरुवात बहुजन समाजातील लोकांनीच करावीच लागेल.
दुसरा आणि महत्त्वाचा भाग ग्रामीण भागामध्ये जिथे वडाचे झाड आहे त्या ठिकाणी महिला *हाच नवरा सात जन्मी मिळू दे* म्हणून केविलवाणा प्रयत्न करत असतात.यासाठी प्रार्थना करतात. मला प्रश्न पडतो की ज्या नवर्यांना कमवता येत नाही. आनंदाने जगता येत नाही. तो दुसऱ्याला जगू देत नाही. नशेच्या अधीन गेलेला माणूस प्रॉपर्टी विकतो, नशापान करतो.अशा माणसाबरोबर सात जन्म पुन्हा पुन्हा तोच नवरा मिळावा याच्यासाठी महिला का वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात.! शिकलेल्या सवरलेल्या महिलांना अजूनही का समजत नाही! आणि फेर्या मारल्या नंतर तोच नवरा कधी मिळत नसतो. आणि मिळणारही नाही. याकडे त्या बाईने सकारात्मक दृष्टीने वैज्ञानिक दृष्टीने पाहिले पाहिजे की नाही! आज आपण शिकलो आहोत.सावरलो आहोत.तरीही लोक करतात म्हणून आम्ही करत असतो मग माणसात आणि मेंढरात फरक काय?
हे झालं ग्रामीण भागातलं *आता शहरी भागातला जर विचार केला तर शहरातली पूर्ण वडाची झाडं तुटून गेली आहेत. पैसे मिळतात म्हणून लोक लाखो टन वडाच्या फांद्याची कत्तल करून त्यांची विक्री करतात.याकडे साशन आणि निसर्गप्रेमी यांचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. याकडे मी तुमचं लक्ष केंद्रीत करू इच्छितो.*
नागपूर,सोलापूर, पुणे, मुंबई अशी जी मोठी शहरे आहेत. त्या प्रत्येक शहरांमध्ये, प्रत्येक घरामध्ये एक एक फांदी लोक विकत घेतात. आणि त्याची पूजा केली जाते. विचार करा लाखो घरांच्या मध्ये लाखो फांद्या जात असतील आणि घरात या फांदीची पूजा होत असेल तर एवढी मोठी वृक्षतोड कोण थांबवणार?आज आपण वृक्षतोड थांबवू शकलो नाही तर येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही. 22 व्या शतकातील जगणारी माणसं तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत. चित्रात फक्त वडाच्या झाडाचं नाव शिल्लक राहील. आज डायनासोरच चित्राचं आपण नाव घेतो तसंच.वडाच्याच झाडाची नाहीतर सर्व झाडांची कत्तल होईल. ऑक्सिजन मिळनार नाही. म्हणून माणसं तडफडून मरतील.
*महिलांनी जरूर वडाच्या झाडाची पूजा करावी* पण त्याची रीत बदलावी लागेल. दर वर्षाला याच सना दिवशी प्रत्येक महिलेने एक झाड लावावं.ज्या घरांमध्ये नवरा तेवढाच पवित्र आहे. कमवतो आहे. प्रपंच चालवतो आहे. शिवी देत नाही. बायकोला मारत नाही. लेकरा बाळांना शिकवतो. विशेषता मुलींच्या शिक्षणासाठी जास्त चांगलं काम करतो. गुणवंत, नितीवंत, चारित्र्यसंपन्न असा पुरुष ज्या घरात आहे. त्या घरातल्या महिलांनी जरूर वडाच्या झाडाची पूजा करावी.आणि कोणतं ना कोणतं ऐक झाड ह्या सणाच्या निमित्ताने लावावे. हे केल्याने निसर्ग रक्षण होईल. ही पृथ्वी सुशोभित होईल. ऑक्सिजन भरपूर मिळेल. आणि फळेही भरपूर मिळतील…
*चला आज एक झाड लाऊ. वटसावित्री पौर्णिमा साजरी करू*






