Best News Portal Development Company In India

तुळजापूरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; गुन्हा दाखल !

तुळजापूरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; गुन्हा दाखल !
​तुळजापूर प्रतिनिधी :- तुळजापूर शहरात नागरीक सुरक्षित नाहीत. वाहतुकीवर नियंत्रण नाही. दारू पिऊन वाहन चालक बिनदास्तपणे चालवतात कोणाचाही धाक दरारा उरलेला नाही. पायी रस्ता ओलांडताना किंवा पायी चालताना वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लहान वयाच्या मुलांच्या हातात सुद्धा महागड्या गाड्या आहेत. विनापरवाना सर्व अलबेल चाललेलं आहे. चौका चौकात असलेले सिग्नल मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना तुळजापूर जवळील सिंदफळ येथे घडली आहे. येथील हॉटेल चंद्रलोक समोरून पायी जात असलेल्या एका ४३ वर्षीय व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
​करमोद्दीन गणी शेख (वय ४३ वर्षे, रा. तीर्थ खुर्द, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, मृत करमोद्दीन शेख हे ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास सिंदफळ येथील हॉटेल चंद्रलोकच्या समोरून पायी जात होते. दरम्यान, एका अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिवेगात, हायगईने व निष्काळजीपणे चालवून करमोद्दीन यांना जोराची धडक दिली. या धडकेत करमोद्दीन हे गंभीररीत्या जखमी झाले आणि उपचारादरम्यान किंवा अपघाताच्या तीव्रतेमुळे त्यांचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन चालक मदत न करता वाहनासह घटना स्थळावरून पसार झाला.
​या प्रकरणी मृत करमोद्दीन यांचे भाऊ शाबुद्दीन गणी शेख (वय ३६ वर्षे, रा. तीर्थ खुर्द, ता. तुळजापूर) यांनी ९ जुलै २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद (प्रथम खबर) दिली.
​या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६, २८१, १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(अ)(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत असून फरार वाहन चालकाचा शोध घेतला जात आहे.
असे अजून किती बळी जायचे बाकी आहेत असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. तुळजापूरच्या चौकात चौकात ट्रॅफिक जाम होत आहे. तुळजापूरच्या निष्पाप लोकांना जीव गमावावा लागत आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्याची गरज आहे. सीसीटीव्ही नामा मात्र झाले आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india