Best News Portal Development Company In India

मागचा विमा मिळेना, पुढचा हप्ता भरेना- धाराशिवमध्ये पीकविम्यावरून शेतकरी आक्रमक !

मागचा विमा मिळेना, पुढचा हप्ता भरेना- धाराशिवमध्ये पीकविम्यावरून शेतकरी आक्रमक !
​प्रलंबित विम्यातून नवीन हप्ता वजा करण्याची भाजप नेते मकरंद लबडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!
​तुळजापूर प्रतिनिधी :- खरीप हंगाम २०२५ च्या पीकविम्याची हक्काची रक्कम अद्याप खात्यावर जमा झालेली नसतानाच, आता नवीन खरीप हंगाम २०२६ साठी विमा हप्ता भरण्याची वेळ आल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी कमालीचे कोंडीत सापडले आहेत. गतवर्षीच्या नुकसानीची भरपाई मिळालेली नसताना नवीन हप्ता कुठून भरायचा? असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत. या पार्श्वभूमीवर, “शासनाने आधी २०२५ चा विमा द्यावा आणि त्या मंजूर रकमेतूनच २०२६ चा हप्ता वजा करावा,” अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
​भाजप नेते मकरंद लबडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. खरीप २०२५ मधील नुकसानभरपाईचा प्रश्न अद्याप प्रलंबित असताना, शेतकऱ्यांकडून नवीन विम्यासाठी पैशांची अपेक्षा करणे हा एकप्रकारे अन्यायच असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
​निवेदनात शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर एक व्यवहार्य पर्याय ठेवला आहे.
​तात्पुरता भार शासनाने उचलावा- खरीप २०२६ च्या पीकविम्याचा हप्ता सध्या सरकारने स्वतः भरावा.
​रक्कम वजावट करावी- जेव्हा खरीप २०२५ च्या विम्याचा अंतिम निकाल लागेल आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मंजूर होईल, तेव्हा त्या मंजूर रकमेतून २०२६ च्या विम्याचा हप्ता वजा करून घ्यावा.
​उर्वरित रक्कम खात्यावर जमा करावी: हप्त्याची रक्कम वजा करून उरलेली सर्व रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावी.
​”आधीच पावसाची अनिश्चितता, उत्पादनातील घट आणि बाजारभावातील घसरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. सध्या बियाणे, खते आणि शेतीच्या मशागतीसाठीही पैसे नसताना विम्याच्या हप्त्याचा अतिरिक्त भार शेतकऱ्यांवर टाकणे चुकीचे आहे.”
​सुरक्षा कवच की डोकेदुखी?
​नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी किंवा दुष्काळाच्या काळात पीकविमा हा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार मानला जातो. मात्र, जर नुकसान सोसूनही वेळेत भरपाई मिळणार नसेल, तर या योजनेचा मूळ उद्देशच धोक्यात येईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यावर आता शासन काय तातडीचा निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जगाच्या पोशिंदयाला अजून किती दिवस वाट पाहावी लागणार?

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india