Best News Portal Development Company In India

तुळजापुरात खळबळ: भाजी मंडईच्या आरक्षित जागेवरील बांधकामाला नगर परिषदेची ‘स्थगिती’!

तुळजापुरात खळबळ: भाजी मंडईच्या आरक्षित जागेवरील बांधकामाला नगर परिषदेची ‘स्थगिती’!
​दिशाभूल करून परवाना मिळवल्याचा आरोप; ७ दिवसांत खुलासा करण्याचे आदेश, अन्यथा कायदेशीर कारवाई!
​तुळजापूर प्रतिनिधी :- शहरातील नगर परिषद पाठीमागील सिटी सर्व्हे क्र. ९७२ मधील भाजी मंडईसाठी आरक्षित असलेल्या जागेवर दिशाभूल करून बांधकाम परवाना मिळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत, नगर परिषदेने संबंधित बांधकामाला तात्काळ स्थगिती नोटीस बजावली आहे.
​सामाजिक कार्यकर्ते जयकुमार पांढरे यांनी संबंधित प्राधिकरणाकडे या जागेबाबत रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची प्राथमिक पडताळणी आणि उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता, एक महत्त्वाचा खुलासा झाला. संबंधित जागेचे ३० ऑक्टोबर १९७८ रोजीच भूसंपादन झाले असून, ती जागा नगर परिषदेच्या मालकीची झाली आहे. एवढेच नव्हे तर, या भूसंपादनाचा योग्य तो मोबदलाही संबंधितांना पूर्वीच अदा करण्यात आल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
​नगर परिषदेची कडक कारवाई आणि ताकीद
​भूसंपादन झालेल्या सरकारी जागेवर चुकीच्या पद्धतीने बांधकाम सुरू असल्याचे स्पष्ट होताच, नगर परिषद प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत.
​काम थांबवण्याचे आदेश- संबंधितांना नोटीस बजावून सदर जागेवरील सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
​७ दिवसांची मुदत: या संपूर्ण प्रकरणात संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ७ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
​जर बांधकाम त्वरित थांबवले नाही किंवा विहित मुदतीत समाधानकारक उत्तर सादर केले नाही, तर ‘महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६’ (MRTP Act) मधील तरतुदींनुसार पुढील कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला आहे.
​आरक्षित जागेवरील या कारवाईमुळे तुळजापूर शहर आणि नगर परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता संबंधित व्यक्ती ७ दिवसांत काय उत्तर सादर करते, याकडे तुळजापूरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india