बुद्धांची संपूर्ण शिकवण शील, समाधी आणि प्रज्ञेनेच युक्त’ – धम्मचारी अनागारिक चंद्रबोधी
लातूर येथील साप्ताहिक धम्मवर्गात श्रोते मंत्रमुग्ध
पाली-संस्कृत उच्चारांतील फरकांसह प्रज्ञेच्या पातळ्यांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन!
उमरगा/लोहारा (प्रतिनिधी, आदिनाथ भालेराव):- “भगवान बुद्धांची संपूर्ण शिकवण ही शील, समाधी आणि प्रज्ञा या त्रिविध अंगांनी युक्त आहे. मानवी जीवनाचा खरा विकास याच मार्गाने शक्य आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध धम्मचारी अनागारिक चंद्रबोधी यांनी केले.
रविवार, दिनांक १२ जुलै २०२६ रोजी विक्रम नगर, लातूर येथील ‘बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृह’ येथे साप्ताहिक जनरल धम्मवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्य व्याख्याते म्हणून ते बोलत होते.
उच्चारशास्त्र आणि प्रज्ञेच्या पातळ्यांवर प्रकाश
धम्मचारी चंद्रबोधी यांचे अभ्यासपूर्ण प्रवचन या वर्गाचे मुख्य आकर्षण ठरले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी पाली, संस्कृत आणि मराठी भाषांमधील उच्चारांचा सूक्ष्म फरक अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितला. सामान्यतः गाथा पठण करताना उपासकांकडून होणाऱ्या चुका त्यांनी उदाहरणांसह अधोरेखित केल्या व त्या कशा सुधाराव्यात, याचे अचूक मार्गदर्शन केले. यासोबतच, बुद्धांच्या शिकवणीतील ‘प्रज्ञेच्या विविध पातळ्या’ त्यांनी उपस्थितांसमोर स्पष्ट केल्या. त्यांची ओघवती वक्तृत्व शैली, प्रसंगावधान, विविध कथा आणि समर्पक उदाहरणे यामुळे हे प्रवचन अत्यंत बहारदार आणि श्रवणीय झाले.
या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन धम्मचारी कल्याणदस्सी यांनी केले. तर मुरुम येथून या वर्गासाठी विशेष रितीने उपस्थित राहिलेले धम्मचारी धम्मभूषण यांनी धम्मचारी चंद्रबोधी यांचा परिचय करून दिला.
या साप्ताहिक धम्मवर्गाला लातूर आणि परिसरातील धम्ममित्र, धम्मसहायक तसेच बहुजन हिताय वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रबोधी यांच्या या व्याख्यानाने उपस्थित बौद्ध बांधव व विद्यार्थ्यांना धम्माचे मर्म समजून घेण्यास मोठी मदत झाली.








