वारकऱ्यांच्या सेवेत धाराशिव पोलीस! गजानन महाराजांच्या दिंडीला केळी आणि पाणी बॉटलचे वाटप!
पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर परिवहन विभागाचा अनोखा उपक्रम!
तुळजापूर प्रतिनिधी:- धाराशिव पोलिसांचा अनोखा उपक्रम.आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक परंपरा म्हणून ओळखली जाते. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत गजानन महाराज यांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी विठू माऊलीच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. याच भक्तीमय वातावरणात धाराशिव पोलीस दलाने पोलीस कर्तव्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांच्या सेवेत हातभार लावला आहे.
आज दिनांक १५ जुलै २०२६ रोजी, पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पंढरपूरकडे मार्गस्थ होत असलेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या दिंडीतील वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी धाराशिव पोलीस विभागातील मोटर परिवहन विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार पुढे आले. वारीच्या वाटेवर ऊन-पावसाची तमा न बाळगता चालणाऱ्या वारकऱ्यांना ऊर्जा व दिलासा मिळावा, या उद्देशाने मोटर परिवहन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून (स्वखर्चाने) सर्व वारकऱ्यांना केळी आणि थंड पाण्याच्या बॉटल्सचे वाटप केले.
”पोलीस आणि जनतेमधील नाते अधिक दृढ करणारा हा उपक्रम आहे. वारीच्या वाटेवर थकलेल्या वारकऱ्यांची सेवा करणे हे आमचे परमभाग्य आहे. धाराशिव पोलीस दल
पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील आणि सेवाभावी उपक्रमामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. “ज्ञानबा-तुकाराम” आणि “गण गण गणात बोते” च्या गजरात वारकऱ्यांनी धाराशिव पोलिसांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत आभार मानले. या उपक्रमामुळे पोलीस दलातील वर्दीमागील ‘माणुसकीचे’ दर्शन पुन्हा एकदा जनतेला घडले आहे.








