Best News Portal Development Company In India

तुळजापूर मंदिर संस्थानाविरोधात ‘जनहित संघटना’ आक्रमक; आजपासून साखळी उपोषण सुरू!

तुळजापूर मंदिर संस्थानाविरोधात ‘जनहित संघटना’ आक्रमक; आजपासून साखळी उपोषण सुरू!
​ॲड. अजय (भैय्या) साळुंके यांचा इशारा; २०१७ मधील लेखी आश्वासने पाळली नसल्याचा आरोप
​तुळजापूर प्रतिनिधी :- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाने २०१७ मध्ये दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता न केल्याने आणि वारंवार पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने, ‘जनहित संघटना महाराष्ट्र राज्य’ च्या वतीने आज, २१ जुलै २०२६ पासून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
​संस्थेचे संस्थापक ॲड. अजय (भैय्या) ज्ञानेश्वर साळुंके यांच्या नेतृत्त्वाखाली हे उपोषण छेडण्यात आले असून, दररोज सकाळी ११ ते ५ या वेळेत मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा थेट इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
​प्रमुख मागण्या ज्यांसाठी पेटले आंदोलन:
​रुग्णवाहिका तातडीने सुरू करा: मंदिर संस्थानाची रुग्णवाहिका सुरु करण्याचे लेखी आश्वासन देऊनही ती सुरु झालेली नाही. रुग्णवाहिका नसल्याने अनेक भक्तांना प्राण गमवावे लागले आहेत.
​स्थानिकांसाठी विशेष दर्शन सुविधा: ‘गावकऱ्यांच्या गेट’मधून आधार कार्ड पाहून स्थानिक ग्रामस्थांना अभिषेकावेळी दही घालण्याच्या दर्शनाचा लाभ द्यावा.
​समान दर्शन व्यवस्था: विधी व न्याय विभागाच्या सूचनेचे तंतोतंत पालन करून सर्व देवी भक्तांसाठी समान दर्शन व्यवस्था लागू करावी.
​पुजाऱ्यांवरील हुकूमशाही थांबवा: पुजाऱ्यांवर हुकूमशाही पद्धतीने होणारी मंदिर बंदी थांबवून, त्यांचे म्हणणे मांडल्याशिवाय कोणतीही एकतर्फी कारवाई करू नये.
​स्थानिक व पुजाऱ्यांना विश्वासात घ्या: प्राधिकरणादरम्यान गावकऱ्यांना आणि पुजाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय विकास कामे करू नयेत.
​ब्रह्मदेव व उपदेवतांची पुनर्स्थापना: मंदिर विकास प्राधिकरणादरम्यान हलवण्यात आलेल्या ब्रह्मदेव आणि इतर उपदेवतांची पुनश्च विधीवत पुनर्स्थापना करावी.
​’पेड दर्शन’ (पापदर्शन) त्वरित बंद करा: तुळजाभवानीच्या पावन भूमीत पिक्चर थिएटर व तमाशा थिएटरप्रमाणे सुरू असलेली ‘पेड दर्शन’ (पैसे देऊन दर्शन) व्यवस्था तात्काळ बंद करण्यात यावी.
​पूर्वपार दर्शन व्यवस्था पूर्ववत करा: राजे शहाजी महाद्वारातून प्रवेश देऊन पूर्वपार चालत आलेली दर्शन व्यवस्था पुन्हा सुरू करावी, जेणेकरून ५० ते ६० टक्के भाविकांना त्रासाविना पूर्वपार दर्शन करता येईल. कृत्रिमरीत्या निर्माण होणारी गर्दी व रांगा यामुळे कमी होतील.
​”प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होईपर्यंत आमचे हे साखळी उपोषण दररोज सुरुच राहील!” > — ॲड. अजय (भैय्या) साळुंके (उपोषणकर्ते व संस्थापक, जनहित संघटना)

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail