Best News Portal Development Company In India

धाराशिवमध्ये पावसाच्या मोठ्या खंडाने सोयाबीन वाळले; मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा!

धाराशिवमध्ये पावसाच्या मोठ्या खंडाने सोयाबीन वाळले; मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा!
​तुळजापूर प्रतिनिधी :-
जिल्ह्यात पावसाने गेल्या महिन्याभरापासून मारलेल्या ओढीमुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे. ऐन फुले आणि शेंगा धरण्याच्या काळातच पीक जळून चालल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेत, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले.
​धाराशिव हा मुख्यतः खरीपातील सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून असलेला जिल्हा आहे. मात्र, यंदा पावसाचा मोठा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा संपला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्यांच्यात तीव्र नैराश्य पसरले आहे.
​मनसेच्या प्रमुख मागण्या-
​नुकसान भरपाई: जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५०,००० रुपयांची आर्थिक मदत द्यावी.
​संयुक्त पंचनामे: महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकामार्फत पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत.
​पिक विमा भरपाई- पीक विमा कंपन्यांना ७२ तासांच्या आत नुकसानीचे सर्वेक्षण करून विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश द्यावेत.
​कर्जमाफी व नवे कर्ज- शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील कर्ज पूर्णपणे माफ करावे आणि आगामी रब्बी हंगामासाठी बिनव्याजी नवे कर्ज उपलब्ध करून द्यावे.
​”शासनाने या निवेदनाची तात्काळ गंभीर दखल घेऊन बळीराजाला दिलासा द्यावा. अन्यथा, मनसेला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल.”
— महेश जाधव (जिल्हाध्यक्ष, मनसे)
​निवेदन देताना मनसे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, तुळजापूर तालुकाध्यक्ष मलिकार्जुन कुंभार, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, सोमेश्वर आलुरे आणि समिर शेख यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india