*श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्री-आविष्कार कार्यशाळा संपन्न*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
[कल्पनेपासून आविष्कार आणि आविष्कारापासून स्टार्टअपपर्यंत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन]
उमरगा, दि. २९ : नवनिर्मिती आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या युगात विद्यार्थ्यांच्या कल्पनांना संशोधनाची जोड देऊन त्यांचे रूपांतर प्रत्यक्ष प्रारूपात आणि पुढे यशस्वी स्टार्टअपमध्ये होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आगामी ‘आविष्कार’ स्पर्धेत स्थानिक समस्यांवर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून व्यावहारिक व नाविन्यपूर्ण उपाय सुचविणारे प्रकल्प सादर करावेत, असे प्रतिपादन धाराशिव येथील प्रा. डॉ. सुयोग अमृतराव यांनी केले.
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय आयक्युएसी आणि महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या ‘करिअर कट्टा’ इन्क्युबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी ‘प्री-आविष्कार कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. अमृतराव बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर, डॉ. पद्माकर पिटले, डॉ. विनोदकुमार वायचळ, डॉ. विक्रम शिंदे आणि प्रा. जी. एस. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘आयडिया टू मॉडेल’ या विषयावर नांदेड येथील डॉ. काशिनाथ भोगले यांनी मार्गदर्शन केले. कल्पनेची निवड, तिचे संकल्पनेत रूपांतर आणि त्यातून प्रत्यक्ष मॉडेल विकसित करण्याची प्रक्रिया त्यांनी स्पष्ट केली. नाविन्यपूर्ण कल्पनांना शास्त्रीय व व्यावहारिक स्वरूप देताना आवश्यक असणाऱ्या विविध बाबी तसेच ‘आविष्कार’ स्पर्धेसाठी प्रभावी मॉडेल तयार करण्याच्या पद्धती त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.
‘आयडिया जनरेशन टू स्टार्टअप’ या विषयावरील दुसऱ्या सत्रात प्रा. वैभव कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील समस्या ओळखून त्यातून व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त कल्पना कशा विकसित करता येतात, याची त्यांनी उदाहरणांसह माहिती दिली. कल्पनेचे मूल्यांकन, व्यवहार्यता, बाजारपेठेची गरज आणि कल्पनेचे स्टार्टअपमध्ये रूपांतर या प्रक्रियेवर त्यांनी प्रकाश टाकला. कल्पना केवळ मनात न ठेवता तिचे उत्पादन अथवा सेवेत रूपांतर करून उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
तिसऱ्या सत्रात ‘आयडिया टू आविष्कार’ या विषयावर डॉ. अविनाश जम्मा यांनी मार्गदर्शन केले. नाविन्यपूर्ण कल्पना शोधून त्यांचे संशोधनाधारित आविष्कारात रूपांतर करण्याची प्रक्रिया त्यांनी स्पष्ट केली. कल्पनेची उपयुक्तता, नावीन्य, व्यवहार्यता आणि सामाजिक गरज लक्षात घेऊन प्रकल्प विकसित करण्याच्या विविध टप्प्यांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. समारोप सत्र प्रा. जी. एस. मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
कार्यशाळेस इन्क्युबेशन सेंटरचे समन्वयक डॉ. अशोक पदमपल्ले, डॉ. व्ही. एस. सूर्यवंशी, डॉ. श्रीकृष्ण मुंडे, करिअर कट्ट्याचे समन्वयक डॉ. समाधान पसरकल्ले, डॉ. चंद्रसेन करे, डॉ. अर्जुन कटके यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. श्रीशैल्य तोडकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. अशोक पदमपल्ले यांनी आभार मानले. कार्यशाळेमध्ये विविध महाविद्यालयातील ३१० प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.







