धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम संकटात! शेतातील प्रत्यक्ष विदारक स्थितीचा अहवाल शासनाला सादर करा – आमदार राणाजगजितसिंह पाटील.
तुळजापूर प्रतिनिधी:-
जिल्ह्यात यंदा पावसाच्या मोठ्या ओढीमुळे खरीप पिके धोक्यात आली असून ५० ते ६० टक्के पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ पावसाच्या आकडेवारीवर अवलंबून न राहता, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी आणि महसूल अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाद्वारे सर्व तालुक्यांमध्ये तातडीने प्रत्यक्ष पीक पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल राज्य शासनाला सादर करावा, अशी आग्रही सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.
पिकांची बिकट अवस्था आणि पावसातील खंड
पर्जन्यमानाची तूट- जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ २९ टक्के पाऊस झाला आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत एकूण सरासरीच्या फक्त ७३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७ टक्के कमी पाऊस झाला आहे.
पावसाचा सलग खंड- अनेक महसूल मंडळांमध्ये मागील १५ ते ३० दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने पिकांवर पाण्याचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
रोग व किडींचा प्रादुर्भाव- पावसातील दीर्घ खंडामुळे पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली असून शेतात रोग व किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.
संयुक्त पथकांद्वारे शास्त्रोक्त पाहणीची मागणी
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले की, खरीप उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खालीलप्रमाणे तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
संयुक्त पथकांची नियुक्ती- कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, पीकशास्त्रज्ञ (ॲग्रोनॉमिस्ट), हवामानशास्त्रज्ञ (मेट्रोलॉजिस्ट), तसेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त पथके स्थापन करून प्रत्यक्ष शेतांमध्ये पाहणी करण्यात यावी.
शास्त्रीय मूल्यमापन- पिकांवरील ताण, रोग-किडींचा प्रादुर्भाव आणि उत्पादनातील घट याचे अचूक मूल्यमापन करून पिके वाचवण्यासाठी आवश्यक तात्पुरत्या उपायांचा अहवालात समावेश करावा.
शासनस्तरावर पाठपुरावा- सर्व तालुक्यांचा एकत्रित जिल्हास्तरीय अहवाल राज्य शासनाकडे पाठवून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळवून देण्यासाठी निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.





