*कोरडा दुष्काळ जाहीर करा गटनेत्या सुनिता पावशेरे यांचे तहसीलदारांना निवेदन*
उमेश सुररवसे
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
(दि.३.)उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळ व परिसरामध्ये मागील सुमारे तीन महिन्यांपासून अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली खरीप पिके वाया गेली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने सरसकट आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई देण्यात यावी तसेच परिसरात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी ग्रामपंचायत गटनेत्या तथा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सुनिता देविदास पावशेरे यांनी केली आहे.
याबाबत ११० हून अधिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीसह उमरग्याचे तहसीलदार गोविंद येरमे यांना दि. २ निवेदन देण्यात आले., या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी तसेच कृषिमंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, कलदेव निंबाळ व परिसरामध्ये पावसाळा सुरू होऊनही तीन महिने झाले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिसरातील प्रमुख खरीप पीक असलेले सोयाबीन, मूग, उडीद तसेच इतर पिके पाण्याअभावी करपून वाळू लागली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली होती. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक खर्च वाया गेला आहे. पेरणीसाठी महागडे बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे, खुरपणी, मशागत तसेच इतर शेतीकामांवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीमध्ये गुंतवणूक केली असून, आता पिके वाया गेल्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
दरम्यान, पावसाअभावी केवळ शेतीचेच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचे संकटही दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. परिसरातील विहिरी, बोअरवेल व इतर जलस्रोतांमधील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून, काही ठिकाणी पाणीसाठे पूर्णपणे आटण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे. त्यातच समाधानकारक पाऊस न झाल्यास आगामी रब्बी हंगाम घेणेही कठीण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील हे दुहेरी संकट लक्षात घेऊन शासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही विलंबाशिवाय सरसकट आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवावा. कलदेव निंबाळ व परिसरातील अत्यल्प पाऊस व गंभीर परिस्थितीचा विचार करून कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच मीरा पाटील, चेअरमन तुकाराम बिराजदार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मल्लिनाथ कारभारी यांच्यासह शेतकरी मधुकर गुगळगावे, श्रीशैल जेकेकुरे, संगीता चांडक, अशोक सूर्यवंशी, शोभा कांबळे, मच्छिंद्र ढोणे, लक्ष्मण भालेराव, उमाकांत पाटील, किरण स्वामी, प्रभाकर बिराजदार, वैजनाथ गायकवाड,शिवाजी रसाळ, अनिरुद्ध पवार, दत्तात्रय पावशेरे,आत्माराम कारभारी, माधव बलसुरे, साईनाथ कांबळे, भरत साळुंखे, गोरख भंडे, उत्तम सरवदे, अशोक सूर्यवंशी, इमाम मुल्ला, नागनाथ चिंचोले, सुधाकर कुलकर्णी, मूलचंद लड्डा,विष्णू बलसुरे, उत्तम सरवदे, दिगंबर घंटे यांच्यासह सर्व शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.





