तुळजापूर खुर्द : आधी लोकशाहीचं मंगलकार्य… मग श्यामचं लग्न! नवरदेव थेट घोड्यावरून मतदान केंद्रावर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
लोकशाहीचा सण आणि लग्नाचा सोहळा – दोन्ही एकाच दिवशी! पण कर्तव्याला प्राधान्य देत तुळजापूर खुर्द येथील नवरदेव श्याम भोजणे यांनी लग्नाच्या आधी मतदान करून एक आदर्श घालून दिला.
लग्नाची घाई, वरातीची धामधूम, वाजतगाजता निघालेली मिरवणूक… पण यामध्येही श्याम भोजणे यांनी लोकशाहीची हजेरी चुकवली नाही. परण्यासाठी आणलेल्या घोड्यावर बसून त्यांनी थेट मतदान केंद्र गाठले.
नगरपालिका शाळेत असलेल्या केंद्रावर पोहोचताच उपस्थित नागरिकांनीही टाळ्यांच्या गजरात या ‘लोकशाहीप्रेमी नवरदेवा’चे स्वागत केले. श्याम यांनी शांतपणे रांगेत उभे राहून मतदान केले आणि त्यानंतरच लग्नाच्या पुढील कार्यक्रमांना सुरुवात झाली.
नवरदेवाने केलेल्या या आदर्श कृतीची गावभर चर्चा असून तरुणांसाठी ते प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. लोकशाहीच्या कर्तव्याला प्राधान्य दिले तर वेळ, परिस्थिती, प्रसंग काहीच आड येत नाही हे श्याम भोजणे यांनी दाखवून दिले आहे!







