मराठी भाषा गौरव दिनी ‘विद्यार्थी दत्तक’ महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ : होतकरू विद्यार्थ्यांसाठी ज्ञान किरण सामाजिक संस्थेचा संकल्प
—————————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड)
मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने धाराशिव येथे ज्ञानकिरण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गरीब, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी “ विद्यार्थी दत्तक” या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या संस्थेच्या या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सभागृहात य पार पडलेल्या कार्यक्रमात धाराशिवचे निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर , उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा सदस्य सचिव, जिल्हा मराठी भाषा समिती स्वाती शेंडे, उपजिल्हाधिकारी श्रीकांत पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनूरे, शिक्षणाधिकारी (प्रा . ) रविंद्र खंदारे, यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी मा. हनुमान ढाकणे, साहित्यिक राजेंद्र अत्रे, साहित्यिक युवराज नळे, उपशिक्षणाधिकारी दत्तप्रसाद जंगम, उपशिक्षणाधिकारी कैलास पिकवणे, ज्ञानकिरण संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे ,कवयित्री प्रा. सुनिता गुंजाळ, साहित्यिक समाधान शिकेतोड , पत्रकार अनिल आगलावे , , कल्पना काशीद , कवयित्री भाग्यश्री देवकते , उपस्थित होते.
यावेळी बोलताना मान्यवरांनी शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. “शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती होत नाही,” असे सांगत अनेक विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके किंवा फी अभावी शिक्षण अर्धवट सोडावे लागते . अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत ज्ञानकिरण बहुउद्देशीय सामाजिक संस्था इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाकांक्षी योजना राबवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या योजनेअंतर्गत निवडलेल्या विद्यार्थ्यांना वह्या, स्पर्धात्मक पुस्तके, शैक्षणिक फी, स्कूल बॅग तसेच इतर शालेय साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची अखंड साथ देण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सुरू झालेली ही योजना भविष्यात अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






