तुळजापुरात पूर्ववैमनस्यातून १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; शहरात खळबळ!
तुळजापूर (धाराशिव):- सदरील घटनेने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणनिर्माण झाले आहे.
तुळजापूर शहरात पूर्ववैमनस्यातून एका १९ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील जय मेडिकलसमोर मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत कृष्णा अनंत रसाळ (वय १९, रा. एस.टी. कॉलनी, तुळजापूर) आणि आरोपींमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादाचे पर्यावसान रक्तरंजित घटनेत झाले. दि. ३ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२:१० वाजण्याच्या सुमारास, आरोपी प्रथमेश कांबळे आणि प्रसाद रोचकरी (दोघेही रा. तुळजापूर) यांनी संगनमताने कृष्णाला गाठले.
जुन्या भांडणाचे कारण काढून आरोपींनी प्रथम कृष्णाला शिवीगाळ केली. त्यानंतर संतापलेल्या आरोपींनी धारदार शस्त्राने कृष्णाच्या गळ्यावर, खांद्यावर आणि पोटावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात कृष्णा गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत कृष्णाचे वडील अनंत महादेव रसाळ (वय ४९) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दि. ४ मे २०२६ रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या खालील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे:
कलम १०३(१): खून (Murder)
कलम ११५(२): स्वेच्छेने दुखापत करणे
कलम ३५२: शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे
कलम ३(५): समान हेतूने केलेले कृत्य
भरवस्तीत आणि मुख्य चौकात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलीस आता या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असून, पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.सदर घटनेने आरोपींच्या मनातील पोलिसांचा धाक कमी होत चाललेला आहे हे प्रचलित होते.तुळजापूर शहरांमध्ये शांतता कायम राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.






