गोकुळ शुगर लि. थकीत ऊस बिल मागनीसाठी शेतकऱ्यानी कंबर तलावात केलेल्या जलसमाधी आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला
——————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
सोलापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कंबर तलावात,गोकुळ शुगर लि.धोत्री थकीत ऊस बिल मागणीसाठी दि.१०जून२६ रोजी शेतकऱ्यांनी केलेल्या जलसमाधी आंदोलनास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या आंदोलनाने संबंधित प्रशासन खडबडून जागे झाल्याचे दिसून येते.
गेल्या १७ ते १८दिवसापासून धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी, गोकुळ शुगर लि.धोत्री थकित ऊस बिल आंदोलन व शेतकरी संघर्ष समिती तुळजापूर आणि अक्कलकोट यांच्यावतीने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी गोकुळ शुगर लिमिटेड धोत्री ला आपला ऊस गळपायासाठी दिला परंतु अध्याप त्यांना त्यांच्या हक्काचे ऊस बिल मिळाले नाही म्हणून आपले थकीत ऊस बिल मिळावे या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी सोलापूर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.या आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी दि१० जून २०२६ रोजी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सोलापूर येथील कंबर तलावात लक्षवेधी जलसमाधी आंदोलन केले.सकाळी ठीक११.०० दरम्यान गोकुळ शुगर लि.च्या नावाने व संबंधित प्रशासनाच्या विरोधात बोंब ठोकून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनाच्या ठिकाणापासून ते कंबर तलावापर्यंत आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी “ऊस बिल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे” ” कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही” “गोकुळ शुगर चे करावं काय खाली मुंडके वर पाय” अशा संतप्त जन आक्रोश करणाऱ्या घोषणा देत मोर्चाने कंबर तलावाकडे गेले व त्या ठिकाणी नियोजित जलसमाधी आंदोलन करून आता तरी आम्हाला आमच्या हक्काचे ऊस बिल द्या अशी जोरदार मागणी केली. यावेळी सोलापूर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनास चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकांनीही प्रचंड गर्दी करून या आंदोलनाचे समर्थन केले. एकंदरीत या आंदोलनाला सर्व थरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या आंदोलनाने संबंधित प्रशासन शासन खडबडून जागे झाले असून तात्काळ सर्व शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे थकीत ऊस बिल दिले जाईल असे शासन व प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्याने तुर्तास हे आंदोलन थांबविण्यात आले आहे.






