Best News Portal Development Company In India

तुगाव येथील दलित नागरिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या अटकेसाठी बेमुदत उपोषण!

*तुगाव येथील दलित नागरिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या अटकेसाठी बेमुदत उपोषण*

उमरगा लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दि. १६: ता. उमरगा येथील तुगाव गावातील भालचंद्र चोकोबा कांबळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याच्या निषेधार्थ गावातील नागरिकांनी सोमवारी (दि. १५) उमरगा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ मे २०२६ रोजी काही आरोपींनी भालचंद्र कांबळे यांना जेवणाच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना शेतातील एकांत भागात नेऊन जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली तसेच जिवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ही घटना केवळ वैयक्तिक वाद नसून अनुसूचित जातीतील व्यक्तीला लक्ष्य करून जातीय द्वेषातून करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

याप्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, मारहाणीचे चित्रीकरण करून ते सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याचाही आरोप संबंधित आरोपींवर करण्यात आला आहे.

मात्र गुन्हा दाखल होऊन जवळपास एक महिना उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने तुगाव गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, निष्पक्ष तपास करावा आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

उपोषणात जेष्ठ नेते हरीश डावरे, एस. के. चेले, रामभाऊ गायकवाड, भालचंद्र कांबळे, धीरज बेळंबकर, संजय कांबळे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले आहेत. तसेच ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपोषणस्थळी भेट देत आहेत.

उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जोपर्यंत संबंधित आरोपींना अटक होत नाही आणि ठोस कारवाई केली जात नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहील आसा ईशारा देण्यात आला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india