Best News Portal Development Company In India

धाराशिव जिल्ह्यात तत्काळ ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करा, अन्यथा तीव्र आंदोलन; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरकारला इशारा!

धाराशिव जिल्ह्यात तत्काळ ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करा, अन्यथा तीव्र आंदोलन; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरकारला इशारा!
​तुळजापूर (तालुका प्रतिनिधी):
धाराशिव जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण जिल्हा गंभीर दुष्काळी छायेत सापडला आहे. पावसाअभावी हातात आलेली खरीप पिके पूर्णपणे जळून खाक झाली असून, आगामी रब्बी हंगामही पूर्णतः धोक्यात आला आहे. विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याने शेतकरी, नागरिक आणि गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.
​या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठवाडा अध्यक्ष श्री. रविंद्र भिमाशंकर इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मा. मुख्यमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन तुळजापूरचे मा. तहसीलदार यांच्यामार्फत सादर करण्यात आले.
​स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या:
​दुष्काळ घोषणा: धाराशिव जिल्हा तातडीने ‘कोरडा दुष्काळग्रस्त’ म्हणून घोषित करण्यात यावा.
​आर्थिक मदत व पीक विमा: बाधित शेतकऱ्यांना प्रति एकरी ५०,००० रुपये सानुग्रह अनुदान व थकित पीक विमा त्वरित मंजूर करून खात्यावर वर्ग करावा.
​कर्जमुक्ती: सर्व राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांची शेतकरी कर्जे १००% विनाअट पूर्णपणे माफ करण्यात यावीत.
​पाणी व चारा छावण्या: गुरांसाठी मोफत चारा छावण्या आणि गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँकर तात्काळ सुरू करण्यात यावेत.
​शुल्क माफी: दुष्काळग्रस्त भागातील मुला-मुलींचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे.
​८ दिवसांचा ‘अल्टीमेटम’
​शासनाने पुढील ८ दिवसांच्या आत जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून मदतकार्य सुरू केले नाही, तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात रस्ता रोको व तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
​याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रविंद्र इंगळे, प्रदेशाध्यक्ष घनश्याम चौधरी, कल्याणभाऊ भोसले, राजाभाऊ लकडे, दुर्वास भोसले, मकबुल सुभानी, शहाजी सोमवंशी, धनाजी पेंदे, आबाजी नरवडे, बळीराम बाबर यांच्यासह संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india