रस्त्याच्या कामाच्या वादातून रक्तरंजित हल्ला; कोयते, कुऱ्हाडी, बंदुकांसह टोळक्याचा मगर कुटुंबावर जीवघेणा हल्ला
एक युवक मृत्यूशी झुंजत असताना पोलीस यंत्रणेची बघ्याची भूमिका; राजकीय दबावाखाली कारवाई थंडावल्याचा आरोप !
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
रस्त्याच्या अत्यल्प कामावरून तक्रार न देता थेट दहशतीचा मार्ग अवलंबत महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांच्या नातेवाईकांच्या रस्त्याच्या कामावर जाऊन नंगानाच करीत सुनियोजित हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना तुळजापूर शहरात घडली आहे. कोयते, कुऱ्हाडी, धारदार शस्त्रे व दोन बंदुका घेऊन आलेल्या २५ जणांच्या टोळक्याने अमर मगर व रुषीकेश मगर यांच्या घरावर हल्ला चढवत कुलदीप मगर यांच्यावर निर्घृण वार केले.या हल्ल्यात कुलदीप मगर यांना तब्बल ३५ ते ३६ खोल जखमा झाल्या असून ते मृत्यूशी सोलापूर येथील रुग्णालयात झुंज देत आहेत.
या प्रकरणामागे विनोद गंगणे व त्यांच्या सहकाऱ्यांचा हात असल्याचा थेट आरोप अमर मगर यांनी केला आहे. रस्त्याच्या कामावरून विनाकारण वाद निर्माण करत,अमर मगर यांचे बंधू रूषिकेश मगर यांच्या घरासमोर वाल्मीक कराडवृत्तीच्या लोकांनी नंगानाच करत दहशत निर्माण केली. त्यानंतर नळदुर्ग रोडवर कुलदीप मगर यांच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला करण्यात आला,असे अमर मगर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना म्हणाले.
▪️दि.१६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री पोलीस निरीक्षकांवर फोन; काँग्रेस कार्यकर्ते असल्याची कुजबुज? – माधवराव कुतवळ
या घटनेनंतर पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. माधवराव कुतवळ यांनी आरोप करताना सांगितले की,“रात्री पोलीस निरीक्षकांना फोन येत होते आणि अत्यंत आदराने संवाद साधला जात होता. ‘ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत’ अशी माहिती कुणाला दिली जात होती का? हा संशय दूर झाला पाहिजे.”
▪️भाजपाच्या साध्या अर्जावर तत्काळ कारवाई,मात्र येथे बघ्याची भूमिका का ?
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी साधा अर्ज दिला तरी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख आणि पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे तत्काळ हजर होतात. मात्र येथे एक युवक मृत्यूशी झुंज देत असताना ना बंदुका जप्त, ना ठोस गुन्हा दाखल – ही दुर्दैवी बाब आहे, असा संताप काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड,धिरज पाटील यांनी व्यक्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
ते पुढे बोलताना म्हणाले,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ,निलेश देशमुख यांना माहिती देऊनही ते उशिरा घटनास्थळी पोहोचले. हल्लेखोर दारू व ड्रग्जच्या नशेत होते.कुलदीप मगर यांच्यावर दोन ते तीन वेळा धारदार हत्याराने वार झाले, तरी देखील कुलदीप मगर यांनी दोन हल्लेखोरांना पकडून ठेवले होते. नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र अद्याप गंभीर गुन्हा दाखल न होणे धक्कादायक आहे.
▪️८ ते १० घावटी बंदुका शहरात फिरतायत – अमर मगर
तुळजापूर शहरात मोठ्या प्रमाणात घावटी बंदुका असल्याचा गंभीर आरोप करीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर म्हणाले,जवळपास ८ ते १० अवैध बंदुका शहरात फिरत असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून त्या जप्त कराव्यात.
▪️राजकीय कट; रस्त्यावर उतरून आंदोलन करणार – धिरज पाटील
हा हल्ला म्हणजे महाविकास आघाडीविरोधातील राजकीय कट आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढावे. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू,असा इशारा ॲड धिरज पाटील यांनी दिला.आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किंवा कार्यकर्त्यांवर कोणताही गुन्हे नाहीत. विनाकारण आमच्यावर हल्ला करण्यात आला,असेही त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणाची आमदार राणाजगजितसिंह पाटील, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी तातडीने दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
▪️पत्रकार परिषदेला मान्यवरांची उपस्थिती
ही माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर, माधवराव कुतवळ, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धिरज पाटील, नरेश पेंदे, भाऊ भांजी, धर्यशील पाटील, आनंद जगताप, सुधीर कदम, भारत कदम, रणजित इंगळे यांच्यासह पदाधिकारी आदी उपस्थित होते.
चौकट
महाविकास आघाडीचे आमदार तथा शिवसेना जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी तुळजापूर येथे येऊन चिघळलेले वातावरण शांत करण्याचे भूमिका बजावली मात्र भाजपाचे आमदार राणाजगजिसिंह पाटील यांना पूर्वकल्पना असताना सुद्धा तुळजापूर शहरात कोणतेही पदाधिकारी किंवा स्व:ता आलेले दिसले नाहीत.तरी संबंधित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींना ताब्यात घ्यावी माधवराव कुतवळ यांनी बोलताना सांगितले







