Best News Portal Development Company In India

मराठा सेवा संघ आयोजित भव्य खान्देशस्तरीय वधू-वर परिचय मेळावा : १ मार्च रोजी आयोजित!

मराठा सेवा संघ आयोजित भव्य खान्देशस्तरीय वधुवर परिचय मेळावा १ मार्च रोजी
वधू-वर नोंदणी अंतिम टप्प्यात; १० फेब्रुवारी अंतिम मुदत
तुळजापूर प्रतिनिधी :
मराठा सेवा संघ, धुळे जिल्हा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य खान्देशस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून हा मेळावा रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी हिरे भवन, स्टेशन रोड, धुळे येथे पार पडणार आहे. सध्या या मेळाव्यासाठी वधू-वर नोंदणी अंतिम टप्प्यात आली असून नोंदणीस समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात येणाऱ्या अत्यंत आकर्षक व उपयुक्त अशा ‘रेशीमगाठी – मराठा अनुरूप’ वधू-वर पुस्तिकेसाठी संपूर्ण खान्देशासह महाराष्ट्रातील विविध भागांत स्थायिक झालेल्या समाजबांधवांकडून मोठ्या प्रमाणावर नावनोंदणी सुरू आहे. खान्देशातील तब्बल ८० नोंदणी प्रतिनिधींमार्फत ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
दि. १ मार्च २०२६ रोजी प्रकाशित होणाऱ्या या पुस्तिकेची छपाई प्रक्रिया सुरू झाली असून छपाईचे काम सुरळीत पार पडावे यासाठी वधू-वर नावनोंदणीचा अंतिम दिनांक १० फेब्रुवारी २०२६ जाहीर करण्यात आला आहे.
एकाच वेळी ५ ते १० हजार समाजबांधवांपर्यंत स्थळ पोहोचण्याची संधी या माध्यमातून मिळत असल्याने आवश्यक तेवढे व योग्य प्रस्ताव येण्यास मदत होते, असा अनुभव अनेक नातेवाईकांनी घेतला आहे. मागील वर्षी प्रकाशित झालेल्या ‘रेशीमगाठी’ पुस्तिकेमधून असंख्य विवाह जुळून आल्यामुळे यंदाही समाजबांधवांनी मोठ्या उत्साहाने नावनोंदणी केली आहे.
नावनोंदणी करणाऱ्या सदस्यांना वधू-वर पुस्तिका मोफत देण्यात येणार असून, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘रेशीमगाठी मराठा मॅट्रिमोनी’ ॲपवर देखील सर्व नोंदी अपलोड करण्यात येणार आहेत. त्यामुळे समाजबांधवांनी आपल्या संपर्कातील उपवर मुला-मुलींचे बायोडाटा नोंदणी करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
वेळ कमी उरल्याने व्हॉट्सॲपद्वारेही नावनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, यासाठी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष श्री. पी. एन. पाटील यांच्याशी ९४२१४३१०२० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या सर्व समाजबांधवांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.
मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, जास्तीत जास्त समाजबांधवांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी, वधू-वर मंडळ पदाधिकारी, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड यांच्या माध्यमातून संपूर्ण खान्देशातील ग्रामीण भागात संपर्क व संवाद दौरा सुरू आहे. गावोगावी पत्रकांचे वितरण करण्यात येत असून, ग्रामीण समाजबांधवांच्या आग्रहास्तव नावनोंदणीची मुदत वाढविण्यात आली आहे.
मेळाव्यास आपल्या उपवर मुला-मुलींसह जास्तीत जास्त पालकांनी उपस्थित राहून विवाह जुळविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करावी, असे आवाहन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील, सचिव सुनील पवार तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india