भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा एल्गार! मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन; २ मार्चपासून बेमुदत असहकाराचा इशारा
तुळजापूर : महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.एकतायाः सामर्थ्य दर्शयामःस्वस्य अधिकारस्य रक्षणं कुर्मःया ब्रीदवाक्याखाली हे आंदोलन राबविण्यात येणार आहे.आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून कर्मचारी काळ्या फिती लावून केवळ कार्यालयीन कामकाज करतील. त्यानंतर दि. २० फेब्रुवारी २०२६ पासून काळ्या फिती लावून असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात दि. २३ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सामूहिक रजा आंदोलन जाहीर करण्यात आले आहे.यानंतर दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथील मा. जमाबंदी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरीही मागण्या मान्य न झाल्यास दि. २ मार्च २०२६ पासून बेमुदत असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.
या आंदोलनामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल कर्मचाऱ्यांनी खेद व्यक्त करत सहकार्याची विनंती केली असून, प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.






