तुळजापूरजवळ भीषण अपघात: कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी,
अपघातानंतर कार चालक फरार; तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !
तुळजापूर प्रतिनिधी :
गाडी चालवताना आपल्या वेगावर आपले नियंत्रण असणे गरजेचे आहे असे असतानाही नियमांना धाब्यावर बसवत भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एका दुचाकीचा चालक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना तुळजापूर येथे घडली आहे. या अपघातात बसवराज लिंबराज मेनकुदळे (वय ३४, रा. बारुळ, ता. तुळजापूर) यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, अपघात घडल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी कार चालक घटनास्थळावरून पसार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास बसवराज मेनकुदळे हे त्यांच्या दुचाकीवरून (क्र. MH 14 AG 1741) जात असताना, समोरून येणाऱ्या एका कारने (क्र. MH 14 BR 1497) त्यांना जोरदार धडक दिली. कार चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे आणि हायगईने चालवून ही धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.
या भीषण धडकेत बसवराज यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. याच दरम्यान, कारने दुसऱ्या एका दुचाकीलाही (क्र. MH 25 AM 9145) धडक दिली. यामध्ये शिवराज माणिक भुजबळ (वय ३०, रा. वडगाववाडी, ता. लोहारा) हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले. मात्र, माणुसकीला काळिमा फासणारी बाब म्हणजे, कार चालकाने जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी किंवा मदत करण्याऐवजी तिथून पळ काढला.
पोलीसात गुन्हा दाखल तपास सुरू आहे.
मयत बसवराज यांच्या पत्नी सोनाली बसवराज मेनकुदळे (वय २६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी कार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६, २८१, १२५(ए), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४ (अ)(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवा आणि अपघातग्रस्तांना मदत करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे.रस्त्यावर अपघात दिसतात पोलिसांची संपर्क साधावा करण्यात येत आहे.





