रेशन कार्डाशिवाय धान्य नाकारल्याने राडा; रेशन दुकानातील मशीन फोडून २ गावांत खळबळ
तुळजापूर (प्रतिनिधी): सरकारी कामात अडथळा निर्माण करून दहशत माजवण्याचा प्रकार शिराढोण येथे घडला. रेशन कार्डाशिवाय सरकारी धान्य देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने रेशन दुकानातील ई-पॉस मशीन जमिनीवर आदळून फोडल्याची खळबळजनक घटना शिराढोण (ता. तुळजापूर) येथे घडली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास आरोपी विजय राजेंद्र गंभीरे (रा. शिराढोण) हा गावातील रेशन दुकानात गेला. त्याने फिर्यादी उमाबाई अंकुश माने (वय ३० वर्षे) यांच्याकडे रेशन कार्ड नसतानाही गहू आणि तांदूळ देण्याची मागणी केली.
यावेळी फिर्यादीचे पती अंकुश माने यांनी “रेशन कार्डाशिवाय धान्य देता येत नाही,” असे स्पष्टपणे सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने अवाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
२५ हजारांचे नुकसान आणि जीवितास धोका
आरोपीने रागाच्या भरात रेशन दुकानातील सरकारी कामासाठी वापरले जाणारे मशिन (ई-पॉस मशिन) उचलून जमिनीवर जोरात आदळले. यामध्ये मशिनचे अंदाजे २५,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर, आरोपीने सदर मशिन फिर्यादी उमाबाई यांच्या अंगावर फेकले, ज्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे वर्तन केले. दहशत माजवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला.
या प्रकरणी फिर्यादी उमाबाई माने यांनी १ मे २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलिसांनी आरोपी विजय गंभीरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम:
३२४ (४): (नुकसान करणे)
१२५: (जीवितास किंवा वैयक्तिक सुरक्षिततेस धोका निर्माण करणे)
या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
सरकारी कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकरणांत कडक कायदेशीर कारवाई केली जाते. नागरिकांनी कायदा हातात न घेता रीतसर वर्तणूक करावी. असे ग्रामस्थातून बोलले जात आहे.







