Best News Portal Development Company In India

सार्वजनिक ठिकाणी गॅस शेगड्यांचा निष्काळजी वापर,बेंबळी पोलिसांकडून ५ जणांवर गुन्हे दाखल !

सार्वजनिक ठिकाणी गॅस शेगड्यांचा निष्काळजी वापर,बेंबळी पोलिसांकडून ५ जणांवर गुन्हे दाखल ! तुळजापूर! | प्रतिनिधी:- व्यापारी वर्गात नाराजी.
सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून, निष्काळजीपणे गॅस शेगड्या पेटवून मानवी जीविताला धोका निर्माण करणाऱ्या ५ जणांवर बेंबळी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दि. ४ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रवाणी आणि बेंबळी परिसरात काही व्यावसायिक आपल्या हातगाड्यांवर गॅस शेगड्यांचा वापर करून व्यवसाय करत होते. मात्र, हा अग्नी प्रज्वलित करताना सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नव्हती. वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे निष्काळजीपणे अग्नीचा वापर करणे अपघाताला निमंत्रण देणारे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
​बेंबळी पोलिसांनी या प्रकरणी एकूण ५ स्वतंत्र गुन्हे नोंदवले असून, खालील व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.
​धनाजी महादेव हजारे (रा. टाकळी बे.)
​विजयकुमार बब्रुवान मस्के (वय ३६, रा. बेंबळी)
​खंडू शेषेराव लांडगे (वय ३५, रा. एकंबी, ता.औसा)
​सतीश गोविंदराव ढोबळे (वय ४५, रा. समुद्रवाणी)
​अक्षय अमोल परीट (वय २७, रा. समुद्रवाणी)
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई समुद्रवाणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे शेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (लासोना रोड), मोरया हॉटेलच्या पत्र्याचे शेड आणि बेंबळी येथील बाजार चौक परिसरात करण्यात आली.
संबंधित आरोपींनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८७ चे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले आहे. सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देत, पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून या पाचही जणांविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करताना किंवा अग्नीचा वापर करताना नागरिकांनी व व्यावसायिकांनी सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.सदरील कारवाईमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india