तुळजापुरात थरार! गाड्या बाजूला घेण्याच्या कारणावरून दोघांवर चाकूने जीवघेणा हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी :-तुळजापूर शहरात किरकोळ वाद विकोपाला गेला. मोटरसायकल बाजूला घे असे म्हणाल्याच्या किरकोळ कारणावरून दोन जणांवर चाकूने सपासप वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर येथील बोंबले चौकात घडली आहे. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठ, तुळजापूर येथील रहिवासी मयुर बाळासाहेब पेंदे (वय ३५ वर्षे) हे दि. २२ मे २०२६ रोजी बोंबले चौक परिसरातून जात होते. यावेळी आरोपी हर्ष बालाजी सोनंजी (रा. खटकाळ गल्ली, तुळजापूर) याला ‘मोटरसायकल बाजूला घे’ असे बोलल्याचा राग अनावर झाला.
याच कारणावरून आरोपी हर्ष सोनंजी याने मयुर पेंदे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपीने पेंदे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि अचानक चाकूने वार करून गंभीर जखमी केले.
हा वाद सुरू असताना मयुर पेंदे यांचे नातेवाईक पंकज विठ्ठल पेंदे हे भांडण सोडवण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. मात्र, संतप्त आरोपी हर्ष सोनंजी याने त्यांच्यावरही चाकूने हल्ला चढवला. या जीवघेण्या हल्ल्यात मयुर आणि पंकज हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या भयंकर घटनेनंतर मयुर बाळासाहेब पेंदे यांनी दि. २३ मे २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद (प्रथम खबर) दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे तुळजापूर येथे आरोपी हर्ष बालाजी सोनंजी विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भरचौकात घडलेल्या या चाकूचाऱ्याच्या घटनेमुळे तुळजापुरात खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सदर घटनेने तुळजापूर शहरात दहशतीचे वातावरण आहे. कारण अशा घटना वारंवार घडत आहेत जणू आरोपींना कायद्याचा धाकच उरलेला नाही. पोलीस प्रशासनाने कठोरात कठोर पावले उचलून कायदा व सुव्यवस्था राखण्यात चा प्रयत्न करावा अशी तुळजापूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे.






