उमरग्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महावितरण कार्यालयासमोर तीव्र ‘चक्काजाम’ आंदोलन.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दि.२० रोजी महावितरणचा बेजबाबदार कारभार, पीक विमा, पेपर फुटी आणि सोनम वांगचुक यांच्या न्यायासाठी शिवसैनिक रस्त्यावर!
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या महावितरणच्या बेजबाबदार व मनमानी कारभाराविरोधात, तसेच विविध ज्वलंत प्रश्नांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज महावितरण कार्यालयासमोर तीव्र ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान केवळ विजेचाच प्रश्न नाही, तर लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना न्याय मिळण्यासाठी, NEET-TET पेपर फुटीच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी आणि लोहारा तालुक्यातील ३ वंचित महसूल मंडळांचा पीक विम्यात समावेश करण्यासाठी ‘शिवसेना स्टाईल’ने जोरदार आवाज उठवण्यात आला.
दुटप्पी सरकारचा बळीराजाला फटका; वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होत असताना त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा नियमित, अखंडित आणि योग्य दाबाने वीज मिळत नाही, हा सरकारच्या अपयशाचा पुरावा आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे कमी दाबामुळे विद्युत मोटारी जळत आहेत, ट्रान्सफॉर्मर खराब होत आहेत आणि पिकांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या वारंवारच्या इमर्जन्सी लोडशेडिंगने ग्रामीण भागातील विद्यार्थी, माता-भगिनी आणि व्यापाऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच, ग्राहकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने बसवले जाणारे स्मार्ट मीटर तात्काळ थांबवून, मागणी करणाऱ्या ग्राहकांना जुने मीटर परत बसवून द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लोहारा तालुक्यातील ३ मंडळांना पीक विमा मिळेपर्यंत लढा देणार!
लोहारा तालुक्यातील ३ प्रमुख महसूल मंडळांना अद्याप पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर हा अन्याय असून, या तिन्ही मंडळांचा तात्काळ विम्यात समावेश करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आणि लोकशाहीवरील अन्याय खपवून घेणार नाही!
देशात आणि राज्यात NEET व TET परीक्षांमधील पेपर फुटीच्या सत्रामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच, लडाखच्या लोकशाही हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने लढा देणारे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्यावर प्रशासनाकडून होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, त्यांना तात्काळ न्याय मिळाला पाहिजे, असा सूरही आंदोलनातून उमटला.
“शेतकरी, सामान्य जनता आणि विद्यार्थ्यांचा संयम आता संपत चालला आहे. वीज हा आमचा घटनात्मक आणि मूलभूत हक्क आहे, कोणाची मेहरबानी नाही! महावितरण आणि राज्य सरकारने तात्काळ परिस्थिती सुधारली नाही, तर जनतेच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांना ‘शिवसेना स्टाईल’नेच चोख उत्तर दिले जाईल!” असा कडक इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.
प्रमुख मागण्या:
१) शेतकऱ्यांना दिवसा किमान आठ तास अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा करावा.
२) लोहारा तालुक्यातील वंचित ३ मंडळांचा तात्काळ पीक विम्यात समावेश करावा.
३) NEET-TET पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर जलद गतीने कडक कारवाई करावी.
४) पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा.
५) ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम त्वरित थांबवून जुने मीटर बसवावेत.
यावेळी
या तीव्र चक्काजाम आंदोलनाप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक अशोक आप्पा सांगवे, युवानेते डॉ. अजिंक्य पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख विजयकुमार नागणे, तालुका प्रमुख सुधाकर पाटील, युवासेना तालुकाप्रमुख अजित चौधरी, माजी सभापती रणधीर पवार, उपतालुका प्रमुख संतोष कलशेट्टी, शेतकरी सेना तालुकाप्रमुख विजय तालभोगे, संचालक सिद्धाराम हत्तरगे, किरण कुकुर्डे, धीरज बेळंबकर, विभाग प्रमुख मारुती थोरे, अण्णाराव माने, नितीन बिराजदार, महेबुब लंगडे, वहाब आत्तार,जनार्दन बिराजदार, तानाजी जाधव, माधव जाधव आदींसह आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, विद्यार्थी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







