आपसिंगा ग्रामपंचायतीचा गलथान कारभार उघड – पिण्याचा पाणीपुरवठा दुषित; ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका!
तुळजापूर | प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथे गावाला पिण्यासाठी पुरवठा होणाऱ्या जलवाहिनीतून दुषित पाणी येत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मागील काही महिन्यांपासून नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात गटारमिश्रित दुर्गंधीयुक्त दूषितपाणी मिसळत असल्याची गंभीर बाब पुढे आली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
माजी ग्रामपंचायत सदस्य नागेश खोचरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ग्रामस्थांच्या प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पाईपलाईनमध्ये गटारीचे पाणी मिसळत आहे. याबाबत वारंवार ग्रामपंचायतीला कळवूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही,” असा आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य नागेश खोचरे त्यांनी केला आहे.
आपसिंगा ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गळती असून त्याठिकाणी गटारीचे पाणी मिसळत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. दूषित पाण्याचा वापर केल्यास आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही ग्रामपंचायत कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
ग्रामस्थांनी तातडीने पाईपलाईन दुरुस्त करून शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलना शिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.







