रामवाडीत गावठाण जमिनीवरून बौद्ध समाज आक्रमक; बेकायदेशीर अतिक्रमण हटवून जागा विहाराला देण्याची जोरदार मागणी!
जिल्हाधिकाऱ्यांना दिले जळजळीत निवेदन | शासकीय कर्मचाऱ्याच्या पदगैरवापराची चौकशी करा | अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
तुळजापूर प्रतिनिधी:-
मौजे रामवाडी येथील समाज मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या शासकीय गावठाण जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवणाऱ्या भूमाफियांविरोधात समस्त बौद्ध समाज अत्यंत आक्रमक झाला आहे. ग्रामपंचायतीचा स्पष्ट ठराव असतानाही या जागेवर बेकायदेशीर ताबा मारणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करून ही जागा बौद्ध विहारासाठी हस्तांतरित करावी, अशी जोरदार मागणी करत समस्त बौद्ध बांधवांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना जळजळीत निवेदन सादर केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामवाडी ग्रामपंचायतीने बौद्ध विहारासाठी या शासकीय जागेचा अधिकृत ठराव मंजूर केला आहे. तरीदेखील बापू चंदनशिवे, देवानंद चंदनशिवे व अनंत चंदनशिवे यांनी संगनमताने दगड, माती आणि कुंपण घालून सदर जागेवर बेकायदेशीर कब्जा मिळवल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शासकीय कर्मचाऱ्याच्या पदगैरवापराची चौकशी:
या संपूर्ण अतिक्रमण प्रकरणामागे शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा हात असून त्याने आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या पदगैरवापराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कडक विभागीय कारवाई करण्यात यावी.
जातीवाचक धमक्या देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा-
अतिक्रमणाला सनदशीर व शांततापूर्ण मार्गाने विरोध करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करणे, जातीवाचक हीन शब्द वापरून अपमानित करणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करावेत.
संयुक्त मोजणी करून अतिक्रमण तात्काळ हटवा-
तहसीलदार, मंडळ अधिकारी व भूमापक यांच्यामार्फत सदर जागेची संयुक्त मोजणी करण्यात यावी. गावठाण नकाशा, गाव नमुना ८, फेरफार नोंदी आणि ग्रामपंचायतीच्या ठरावाची शहानिशा करून हे अतिक्रमण तात्काळ जमीनदोस्त करावे व बौद्ध विहाराचा मार्ग मोकळा करावा.
प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा!
प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन ठोस कारवाई केली नाही, तर बौद्ध बांधव आणि ग्रामस्थ शांत बसणार नाहीत. सनदशीर आणि लोकशाही मार्गाने ‘तीव्र जनआंदोलन’ छेडले जाईल, असा थेट इशारा या निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.
या आक्रमक निवेदनावर आरपीआय (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजा राऊत, बाळू भोसले, राजेंद्र कोथिंबिरे, शहाजी म्हस्के, पंकज भोसले, विकास कांबळे, धनंजय कांबळे, सुरेश भोसले, मधुकर कोथिंबिरे, धोंडीराम कोथिंबिरे, दत्ता कांबळे, बुबा वाघमार, सागर कसबे (ग्रामपंचायत सदस्य), उत्तम म्हस्के, क्रांती भोसले, शंकर शिरसट, हरिचंद्र सोनवणे, सुनील भालेराव, वाघासाहेब भोसले आणि अविनाश गंगावणे यांच्यासह शेकडो बौद्ध बांधव व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








