वगळलेल्या १३ कोटी मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस आक्रमक; देशभरात १ नोव्हेंबरपासून धडक मोहीम व रामलीला मैदानावर आंदोलन!
भरतसिंह सोलंकी यांचा भाजपसह निवडणूक आयोगावर घणाघाती आरोप; ईव्हीएम अन् मतदार याद्यांमध्ये घोटाळ्याचा दावा
तुळजापूर प्रतिनिधी:-
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या मर्जीतील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून देशातील तब्बल १३ कोटी मतदारांना मतदार यादीतून वगळले आहे. नागरिकांना त्यांच्या घटनात्मक मतदानाच्या अधिकारापासून दूर लोटण्याचे काम भाजप सरकारने केले असून, या वगळलेल्या मतदारांना त्यांचा हक्क पुन्हा मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान देशभरात ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, मत वाचवा, देश वाचवा’ ही व्यापक मोहीम राबवणार आहे,” अशी माहिती काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी भरतसिंह सोलंकी यांनी दिली.
धाराशिव शहरातील काँग्रेस भवन येथे २४ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, लातूर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख, जिल्हा संघटक राजभाऊ शेरखाने, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, खलील सय्यद, धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर, अग्निवेश शिंदे, धनंजय राऊत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-
निवडणूक आयुक्त नियुक्तीवर प्रश्नचिन्ह-
काँग्रेसच्या काळात निवडणूक आयुक्तांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या सहभागाने होत असे. मात्र भाजप सरकारने ही प्रक्रिया बदलून गृह मंत्रालयाकडे घेतली आणि ज्ञानेश कुमार यांच्यामार्फत मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप सोलंकी यांनी केला.
ज्येष्ठ विचारवंतही मतदानापासून वंचित-
निवडणूक आयोगाने जुन्या मतदारांना पुन्हा नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. यामुळे नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातवासारख्या दिग्गजांची नावेही मतदार यादीतून वगळली गेल्याचे सोलंकी यांनी निदर्शनास आणून दिले.
रामलीला मैदानावर मोठे आंदोलन-
वगळलेल्या १३ कोटी मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत व्यापक जनजागृती व आंदोलन छेडले जाणार आहे. यामध्ये देशभरातील काँग्रेसचे लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होतील.
प्रत्येक गावात बीएलए-२ (BLA-2) ची नियुक्ती:
वगळलेले १३ कोटी मतदार नेमके कुठे गेले, असा सवाल उपस्थित करत काँग्रेस पक्ष जिल्हा, तालुका, पंचायत समिती व गाव पातळीवर ‘बीएलए-२’ (Booth Level Agent) नियुक्त करणार आहे. हे प्रतिनिधी वगळलेल्या व नवीन मतदारांची नावे गोळा करून ती बीएलओ (BLO) कडे जमा करतील.
”आगामी ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित”
“ईव्हीएम आणि मतदार याद्यांमधील घोटाळ्यांच्या जोरावर भाजप निवडणुका जिंकत आहे. हरियाणात मतचोरी पकडली गेली आहे. १७ राज्यांमध्ये लागू केलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SSR) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, आगामी पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव निश्चित आहे,” असा विश्वास भरतसिंह सोलंकी यांनी व्यक्त केला.







