Best News Portal Development Company In India

इमानदारीला सलाम! श्री तुळजाभवानी मंदिरात सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेने महिला भाविकाला परत मिळाली हरवलेली पर्स; १० हजार रोख अन् दागिने होते सुरक्षित.

इमानदारीला सलाम! श्री तुळजाभवानी मंदिरात सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेने महिला भाविकाला परत मिळाली हरवलेली पर्स; १० हजार रोख अन् दागिने होते सुरक्षित.
​
तुळजापूर प्रतिनिधी:-
श्री तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात भाविकाची हरवलेली पर्स मंदिर संस्थानच्या सतर्क सुरक्षा कर्मचाऱ्यांमुळे अवघ्या काही वेळातच मूळ मालकिणीला सुरक्षितपणे परत करण्यात यश आले आहे. सुरक्षारक्षकाने दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:२५ वाजण्याच्या सुमारास श्री तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात कर्तव्य बजावत असताना सुरक्षा रक्षक सागर अशोक भिसे यांना एक बेवारस पर्स आढळून आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सागर भिसे यांनी क्षणाचाही विलंब न लावता ती पर्स दर्शन मंडप नियंत्रण कक्षात जमा केली.

​नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी पर्सची पाहणी केली असता, त्यामध्ये १० हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्यासदृश मंगळसूत्र आणि काही महत्त्वाची वैयक्तिक कागदपत्रे असल्याचे निष्पन्न झाले. पर्समध्ये मिळालेल्या कागदपत्रांतील माहितीच्या आधारे मंदिर प्रशासनाने तात्काळ संबंधित महिला भाविकाचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला.

​त्यानंतर संबंधित महिला भाविक आरती भगवान शिंदे (रा. सोलापूर) यांना दर्शन मंडप नियंत्रण कक्षात बोलावून आवश्यक ती शहानिशा व खातरजमा करण्यात आली. पर्समधील सर्व ऐवज सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ती पर्स अधिकृतपणे आरती शिंदे यांच्या स्वाधीन करण्यात आली. आपली हरवलेली पर्स सर्व मौल्यवान वस्तूंसह परत मिळाल्याने सोलापूरच्या शिंदे कुटुंबाने मंदिर प्रशासनाचे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.

​या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सहायक सुरक्षा निरीक्षक ओम खुरुद यांच्यासह मंदिराचे इतर सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. सुरक्षारक्षक सागर भिसे आणि सुरक्षा यंत्रणेच्या या तत्परतेमुळे भाविकांमधून मंदिर प्रशासनाचे विशेष कौतुक होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india