धाराशिवसाठी ऐतिहासिक दिवस! कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाचे ५ टप्पे १००% पूर्ण; पाण्याचा मार्ग मोकला.
तुळजापूर प्रतिनिधी:-
दुष्काळी धाराशिव जिल्ह्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून हक्काचे कृष्णा नदीचे पाणी धाराशिवमध्ये आणण्याच्या महत्त्वाकांक्षी ‘कृष्णा-मराठवाडा प्रकल्पा’ अंतर्गत घाटणे ते रामदरा या मार्गावरील पाचही टप्प्यांतील सर्व कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून, यामुळे तुळजापूर, उमरगा, लोहारासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा दुष्काळ संपण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल पडले आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये-
६२ मजली इमारतीएवढ्या उंचीवर पाण्याचा लोट: घाटणे बॅरेजपासून रामदरा तलावापर्यंत पाणी नेण्यासाठी ५ टप्प्यांतून पाणी उपसा केला जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात ४४.१७ मीटर, दुसऱ्या टप्प्यात ३५.०२ मीटर, तिसऱ्या टप्प्यात २७.१६ मीटर, चौथ्या टप्प्यात २३.५० मीटर आणि पाचव्या टप्प्यात तब्बल ६१.५२ मीटर उंचीवर पाणी उचलले जाईल. हे एकूण अंतर साधारणपणे ६२ मजली इमारतीइतके उंच आहे.
विशाल पंपगृहे व यंत्रणा- पाणी उचलण्यासाठी घाटणे, पडसाळी, सावरगाव, पांगदरवाडी, सिंदफळ आणि रामदरा येथे एकूण ६ भव्य पंपगृहे उभारण्यात आली आहेत. यासाठी एकत्रित ३ लाख २२ हजार ९९६ अश्वशक्ती (HP) क्षमतेच्या पंप-मोटारी, सबस्टेशन, ट्रान्समिशन लाईन्स आणि जलवाहिन्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
मुख्यमंत्र्यांचे विशेष सहकार्य: माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी पाहिलेले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने या प्रकल्पाला प्राधान्य देत ११ हजार ७२६ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला आणि निधीला मंजुरी दिली, ज्यामुळे कामाला प्रचंड गती मिळाली.
उजनीतून १ टीएमसी पाणी लवकरच: दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उजनी जलाशयातून पिण्यासाठी १ टीएमसी पाणी मिळण्याची मागणी विशेष बाब म्हणून मान्य झाली असून, आता या चाचण्या घेणे सहज शक्य झाले आहे.
जिल्ह्याला मिळणारे फायदे-
पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार: रामदरा तलाव व इतर जलसाठ्यांमध्ये पाणी आल्यामुळे गावोगावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबेल.
शेती व भूजल पातळीत सुधारणा: सिंचनासाठी हक्काचे पाणी मिळाल्यामुळे शेती उत्पादनात स्थिरता येईल, भूजल पातळी वाढेल आणि विहिरी-बोअरवेलची पाण्याची उपलब्धता सुधारेल.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना: शेतकरी बांधवांचे आर्थिक उत्पन्न वाढून एकूणच ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेल.
सध्या या संपूर्ण यंत्रणेच्या चाचण्या, तांत्रिक तपासणी आणि प्रत्यक्ष पाणीप्रवाह सुरू करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू असून, धाराशिवकरांची पाण्यासाठीची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे.








