तत्पर सेवा, सुरक्षित दर्शन! नवरात्रोत्सवात सुरक्षा पथकाची कौतुकास्पद कामगिरी!
तुळजापूर प्रतिनिधी:-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव नुकताच अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या महोत्सवाच्या काळात आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविकांनी तुळजापुरात हजेरी लावली होती. या प्रचंड गर्दीचे नियोजन करताना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सुरक्षा विभागाने अत्यंत जबाबदारीने आणि तत्परतेने काम करत भाविकांना मोठा दिलासा दिला आहे.
हरवलेल्या भाविकांना नातेवाइकांशी भेटवून देणे, वैद्यकीय आणीबाणीत प्राण वाचवणे, चोरीला गेलेल्या वस्तू शोधणे आणि गर्दीचे नियोजन करणे अशा अनेक आघाड्यांवर सुरक्षा विभागाने बजावलेली कामगिरी भाविकांच्या कौतुकास पात्र ठरली आहे.
सुरक्षा विभागाच्या कामगिरीचा मुख्य आढावा
७३८ हरवलेल्या भाविकांचे पुनर्मिलन:
गर्दीत ताटातूट झालेल्या एकूण ७३८ भाविकांना सुरक्षा विभागाने त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुरक्षित पोहोचवले.
दर्शन मंडप CCTV नियंत्रण कक्ष: १३८ भाविकांचा शोध.
PCR नियंत्रण कक्ष- ६०० भाविकांचा शोध.
५२ भाविकांना तातडीची वैद्यकीय मदत.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रास झालेल्या ५२ भाविकांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने मदत पुरवली. स्ट्रेचरच्या साहाय्याने त्यांना रुग्णवाहिकेपर्यंत नेऊन पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
३१ मौल्यवान वस्तू मूळ मालकांना परत-
CCTV नियंत्रण कक्षाच्या मदतीने भाविकांच्या हरवलेल्या बॅगा, पर्स, मोबाईल, रोख रक्कम तसेच सोने-चांदीचे दागिने अशा एकूण ३१ मौल्यवान वस्तूंची खात्री करून त्या संबंधित भाविकांना सुरक्षित हस्तगत करण्यात आल्या.
विशेष प्रसंगावधान – सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेने वाचले प्राण.
CCTV मुळे मोबाईल चोर गजाआड (१० ऑक्टोबर २०२६)
दर्शन मंडपाच्या बाहेरील पायऱ्यांवर एका महिला भाविकाचा मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार प्राप्त होताच CCTV नियंत्रण कक्षाने फुटेजची वेगाने तपासणी केली. चोराचा सुगावा लावून त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आणि तो संबंधित महिला भाविकेला सुपूर्द करण्यात आला.
CPR मुळे भाविकाला मिळाले जीवनदान (२५ ऑक्टोबर २०२६)
घाटशीळ मंदिर परिसरात अचानक बेशुद्ध पडलेल्या एका भाविकावर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (MSF) सुरक्षा रक्षक दीपक पोतदार यांनी अत्यंत प्रसंगावधान राखून तातडीने CPR (Cardiopulmonary Resuscitation) दिला. सुरक्षा रक्षकाच्या या प्राथमिक उपचारांमुळे भाविक तात्काळ शुद्धीवर आला. यानंतर ‘SISPL’ च्या कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचरवरून त्याला पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
”लाखो भाविकांची गर्दी असतानाही मंदिर संस्थानच्या सुरक्षा विभाग, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सतर्कता, तत्परता आणि सेवाभाव यांमुळे नवरात्रोत्सव अतिशय सुरक्षित व सुरळीत पार पडला.”






