धाराशिवमध्ये जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ म्हशींसह दोन आरोपी ताब्यात!
तुळजापूर प्रतिनिधी : जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या जनावरांच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ८ म्हशी आणि चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी लासोना परिसरातील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून ५ म्हशी चोरीला गेल्याची घटना घडली होती. याबाबत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जिल्ह्यात अशाच प्रकारच्या अनेक चोरीच्या घटना समोर आल्याने पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.
तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, बीड जिल्ह्यातील नेकनूर परिसरात संशयित व्यक्ती चोरीच्या वाहनासह फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चंद्रकांत जगन्नाथ नन्नवरे (रा. नेकनूर, जि. बीड) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या साथीदार शंकर सुरेश चव्हाण (रा. ढोकी) याचे नाव सांगितले. त्यालाही पोलिसांनी अटक केली.
दोन्ही आरोपींकडून सखोल चौकशी केली असता त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा, लासोना, बेळवंडी, कोंड, तुळजापूर, काटी, सावरगाव, सांगवी, सुरतगाव, वैराग आणि माणकेश्वर या भागांमध्ये जनावरांची चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी एकूण १३ चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून ८ म्हशी, चोरीसाठी वापरलेले महिंद्रा पिकअप वाहन आणि हिरो स्प्लेंडर मोटारसायकल असा सुमारे १२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सध्या पोलिसांकडून आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे . सदरील धाडसी कारवाई धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर (मॅडम) आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शफकत आमना(मॅडम) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडसी पोलीस अधिकारी श्री विनोद ईज्जपवार यांनी व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये या कारवाईमुळे समाधान व्यक्त होत असून, जनावरांच्या चोरीच्या घटनांवर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






