Best News Portal Development Company In India

दिनांक २ एप्रिल २०२६ रोजीच्या छबीना विधीनंतर मंदिर परिसरातील वादाप्रकरणी स्पष्टीकरण !

 

दिनांक २ एप्रिल २०२६ रोजीच्या छबीना विधीनंतर मंदिर परिसरातील वादाप्रकरणी स्पष्टीकरण !
तुळजापूर प्रतिनिधी ;-
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त देवीचा छबीना विधी संपन्न झाला. सदर कार्यक्रमानंतर रात्री सुमारे ११:०५ वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरातील गोंधळ कट्टा व समोरील भागात काही व्यक्तींमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर किरकोळ हाणामारीत झाले. या घटनेदरम्यान संबंधित दोन गटांतील व्यक्तींनी एकमेकांवर नारळ, काठ्या, फळे तसेच इतर उपलब्ध साहित्य फेकून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

मंदिर प्रशासन, पोलीस यंत्रणा, सुरक्षा कर्मचारी तसेच स्थानिक पुजारी यांच्या हस्तक्षेपामुळे १५ मिनिटांमध्ये संपूर्ण परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तींना मंदिर परिसराच्या बाहेर काढण्यात आले तसेच मंदिर परिसरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यात आली.

ही घटना संबंधित व्यक्तींच्या वैयक्तिक वादातून घडलेली असून तिचा मंदिर व्यवस्थापन, धार्मिक विधी किंवा मंदिरातील शिस्त यांच्याशी कोणताही संबंध नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

सध्या या घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असून त्यामध्ये चुकीची व भ्रामक माहिती पसरवली जात आहे. यामुळे भाविकांमध्ये गैरसमज व अनावश्यक भीती निर्माण होण्याची शक्यता आहे. श्री तुळजाभवानी देवी हे महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक व तेलंगणा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने या ठिकाणाच्या संवेदनशीलतेचा विचार करता अशा प्रकारे अफवा पसरवणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे.

मंदिर संस्थानाच्या वतीने सोशल मीडियावर प्रसारित होणारे भ्रामक व दिशाभूल करणारे व्हिडिओ तात्काळ हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकारची माहिती प्रसारित करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छबीना विधी नंतरच्या गोंधळा प्रकरणी मंदिर संस्थानच्या सुरक्षा निरीक्षकांच्या फिर्यादीवरून ३ एप्रिल २०२६ रोजी संबंधित दहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 125, 194(2) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत कलम 135 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच संबंधितांना दोन वर्षे मंदिर प्रवेश बंदी घालण्याचा निर्णय श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने घेतला आहे.

भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सोशल मीडियावर भ्रामक माहिती शेअर करणे टाळावे. मंदिर परिसरात शांतता, सुव्यवस्था व शिस्त राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.

– श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india