*उमरगा तालुक्यातील शिवसैनिकांचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांना भावनिक साकडे*
*”गरज पडली तर आमच्या किडण्या विकू, पण पक्षांतर करू नका”*
उमरगा लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दि. २१ जून : धाराशिवचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले असताना उमरगा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिकांनी त्यांना पक्षांतर न करण्याचे भावनिक आवाहन केले आहे. यासंदर्भात एक लेखी निवेदन देत त्यांनी जनतेच्या भावना आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा मान राखण्याची विनंती केली आहे.
उमरगा तालुक्यातील सुमारे ३३ पदाधिकारी व शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या या निवेदनात गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांमुळे सामान्य शिवसैनिक अस्वस्थ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या चार दशकांपासून अनेक संकटे, राजकीय चढ-उतार आणि संघर्षाच्या काळातही शिवसैनिकांनी शिवसेनेशी निष्ठा कायम ठेवली आहे. त्याचप्रमाणे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनीही कठीण काळात पक्ष आणि शिवसैनिकांची साथ सोडली नाही. त्यामुळेच लाखो शिवसैनिकांच्या मनात त्यांच्याविषयी आदर आणि प्रेमाची भावना आहे.
शिवसैनिकांनी निवेदनात नमूद केले आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव मतदारसंघातील सुमारे सहा लाख मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान केले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेत त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. त्यामुळे पक्षांतर झाल्यास हा केवळ राजकीय निर्णय राहणार नसून लाखो मतदारांच्या विश्वासाचा आणि जनादेशाचा अपमान ठरेल, अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला मुद्दा म्हणजे कथित “ऑपरेशन टायगर” संदर्भातील उल्लेख. प्रसारमाध्यमांत आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार पक्षांतरासाठी मोठ्या आर्थिक ऑफर दिल्या जात असल्याचे आरोप होत आहेत. त्यावर भाष्य करताना शिवसैनिकांनी अत्यंत भावनिक शब्दांत म्हटले आहे की, “जर पक्षांतरासाठी १०० कोटी रुपयांची गरज असेल, तर आम्ही शिवसैनिक आमच्या किडण्या विकून तेवढी रक्कम उभी करू; पण आपण पक्षांतर करू नये.”
तसेच, पक्षांतर करणाऱ्या खासदारांना विकासकामांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी देण्याच्या चर्चांचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. मात्र विकासासाठी निधी मिळविण्याच्या नावाखाली जनादेशाशी तडजोड करू नये, अशी विनंती शिवसैनिकांनी केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी असून पक्ष संघटना अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. अशा वेळी पक्षाशी निष्ठा राखणे हीच खरी शिवसैनिकांची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या विचारांशी आणि ठाकरे कुटुंबाशी असलेली बांधिलकी कायम ठेवावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
शेवटी, “आम्ही सत्ता, पद किंवा लाभासाठी नव्हे तर विचारांसाठी लढणारे शिवसैनिक आहोत. आपण ठाकरे कुटुंबाच्या विचारांशी आणि शिवसेनेच्या निष्ठेशी कायम राहावे, हीच उमरगा-लोहारा तालुक्यातील शिवसैनिकांची मनापासून विनंती आहे,” असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनामुळे धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले असून, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांची पुढील भूमिका काय असेल याकडे आता कार्यकर्ते आणि जनतेचे लक्ष लागले आहे.






