बिडकर पायऱ्यांवर घाण पाण्याचा विळखा, पहिल्याच पावसात भाविकांची गैरसोय!
तुळजापूर प्रतिनिधी:- तुळजाभवानी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना साचलेल्या घाण पाण्यातूनच मार्ग काढावा लागतोय मंदिर प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी भाविक भक्ताकडून करण्यात येत आहे.
तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये रविवारी दुपारी अवघ्या २० मिनिटांच्या मुसळधार पावसाने मंदिर परिसरातील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था पुन्हा एकदा उघडी पडली. बिडकर पायऱ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी व घाण वाहून आल्याने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्याच पाण्यातून मार्ग काढत दर्शन मंडपाकडे जावे लागले. त्यामुळे भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
सध्या वाढत्या भाविकांच्या गर्दीमुळे मुखदर्शन व सशुल्क दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बिडकर पायऱ्यांमार्गे दर्शन मंडपात प्रवेश दिला जात आहे. मात्र रविवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर वेताळनगर डोंगर परिसरातून नाल्याद्वारे मोठ्या वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू झाला. हे पाणी काळभैरव मंदिर परिसरातून थेट बिडकर पायऱ्यांवर येऊन साचले.
याचवेळी श्री तुळजाभवानी मंदिरालगतच्या वगळ भागातूनही घाण पाणी पवेकर यांच्या घरासमोरील रस्त्यावरून दर्शन मंडपाच्या दिशेने वाहू लागले. या दोन्ही बाजूंनी आलेले पाणी एकत्र झाल्याने संपूर्ण मार्ग जलमय झाला. या पाण्यात प्लास्टिक कचरा, गाळ आणि इतर घाण मिसळल्याने भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिस्थितीतून मार्ग काढत दर्शनासाठी जावे लागल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पहिल्याच जोरदार पावसात अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर पुढील संपूर्ण पावसाळ्यात भाविकांची अवस्था काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भाविकांच्या मते, श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अशा परिस्थितीत पावसाचे आणि सांडपाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक आहे. विशेषतः बिडकर पायऱ्यांपर्यंत घाण पाणी पोहोचणार नाही, यासाठी नाले, पाणी निचरा व्यवस्था आणि संरक्षणात्मक उपाय तातडीने राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली असताना पहिल्याच पावसाने मंदिर परिसरातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुलभ दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रखरतेने होत आहे.








