पोलिसांची नोकरी म्हणजे कुटुंबाचा त्याग करून जनतेची सेवा करणे होय: नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे यांचे प्रतिपादन
——————————————————-
नळदुर्ग (एस. के.गायकवाड):
सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची फार मोठी जबाबदारी पोलीस प्रशासनावर असून त्या करिता पोलिसांना नेहमी सतर्क राहावे लागते.कारण कोणत्या वेळी कोणता संवेदनशील प्रसंग उद्भवेल हे सांगता येत नाही आणि ज्या क्षणी एखादा संवेदनशील प्रसंग निर्माण झाला त्याचक्षणी जेवण करता करता हात धुवून पोलिसांना त्या ठिकाणी जावं लागतं,कधी कधी दिवाळी सारखा सण सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये त्यांना आनंदाने साजरा करता येत नाही.याचा विचार केला असता पोलिसांची नोकरी म्हणजे कुटुंबाचा त्याग करून जनतेची सेवा करणे होय असं म्हटलं तरी ते वावगे ठरणार नाही असे प्रतिपादन नळदुर्ग नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे यांनी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
पोलीस दलातून तब्बल ३३ वर्षे सेवा करून मुरूम येथील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या नळदुर्ग येथे स्थायिक झालेले पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार राठोड हे नळदुर्ग पोलीस ठाणे येथून सेवानिवृत्त झाले.त्यांच्या सेवा निवृत्ती निमित्त व त्यांच्या २५ व्या सिल्वर जुबली लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा सपत्नीक सत्कार समारंभाचे आयोजन येथील राणा कॉम्प्लेक्स मध्ये करण्यात आले होते.या वेळी नगराध्यक्ष धरणे बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की पोलीस कर्मचाऱ्यांना रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून २४ तास ड्युटी करावी लागते. त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांना कौटुंबिक स्वास्थ्य ही देता येत नाही अशी खडतड नोकरी करून निष्कलंकपणे सेवानिवृत्त झालेले विजयकुमार पवार यांचे करावे तेवढे कौतूक थोडेच आहे.
. याप्रसंगी शिवसेना (उबाटा ) जिल्हा उपप्रमुख सरदार सिंह ठाकुर, शिवसेनेचे शहर अध्यक्ष संतोष पदाले,नगरसेवक तथा पत्रकार सुधीर पोतदार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे जिल्हा सचिव
एस.के.गायकवाड,सेवानिवृत्त मुख्याध्यापक राठोड सर सह विद्यार्थ्यांची शुभेच्छा पर भाषणे झाली.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कारमुर्ती विजय कुमार राठोड यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करप्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक मारुती कारवे यांनी केले.याप्रसंगी नगराध्यक्ष विरोधी पक्ष घटनेचे व सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील नगरसेवक शिवसैनिक रिपब्लिकन कार्यकर्ते पत्रकार सह सर्वपक्षीय कार्यकर्ते आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे या सत्काराला जवळपास नागरी सत्कार समारंभाचे स्वरूप प्राप्त झाले होते.







