हिंदू व बौद्ध समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी – अभिजीत आपटे!
महाराष्ट्रात जैन महामंडळ आहे. जैन धर्मियांसाठी, मुस्लिम धर्मियांसाठी महाराष्ट्र शासनाने आर्थिक, शैक्षणिक व उद्योजकीय विकासासाठी स्वतंत्र महामंडळांची स्थापना केली आहे. त्याच धर्तीवर हिंदू व बौद्ध समाजाच्या उद्योजकता, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, सहकार आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र ‘हिंदू महामंडळ’ व ‘बौद्ध महामंडळ’ स्थापन करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) उद्योग व सहकार विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष-संघटक अभिजीत आपटे यांनी केली आहे.
आपटे म्हणाले की, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या, सामाजिक न्यायाच्या आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांवर उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सर्व धर्मांना समान सन्मान देण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माविरोधात भूमिका न घेता, सर्व समाजघटकांना समान संधी मिळावी या तत्त्वानुसार हिंदू व बौद्ध समाजासाठीही स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्याची आवश्यकता आहे.
त्यांच्या मते, हिंदू आणि बौद्ध समाजातील अनेक युवक-युवती रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग, कौशल्य विकास आणि सहकार क्षेत्रात संधी शोधत आहेत. या घटकांना आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण, कर्ज सुविधा आणि शासकीय योजनांचा अधिक प्रभावी लाभ मिळावा यासाठी स्वतंत्र महामंडळ उपयुक्त ठरेल.
या मागणीसाठी लवकरच विविध हिंदू आणि बौद्ध धार्मिक, सामाजिक व उद्योजकीय क्षेत्रातील मान्यवर, धर्मगुरू आणि प्रतिनिधी यांची विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असून, त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात येईल, अशी माहिती अभिजीत आपटे यांनी दिली.
त्यांनी स्पष्ट केले की, ही मागणी कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून सर्वांना समान संधी आणि समान विकास या घटनात्मक तत्त्वावर आधारित आहे.






