Best News Portal Development Company In India

थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणाचे अपहरण; सायबर टोळीकडून डांबून ठेवून करून घेतले ऑनलाईन फ्रॉड!

थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणाचे अपहरण; सायबर टोळीकडून डांबून ठेवून करून घेतले ऑनलाईन फ्रॉड!
​तुळजापूर प्रतिनिधी :- तरुणांनो सावधान ऑन – लाईन फसवणुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. फेसबुकवरील नोकरीच्या जाहिरातीला भुलून परदेशात गेलेल्या धाराशिवमधील एका २२ वर्षीय तरुणाची मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात एजंटांनी संगनमत करून या तरुणाला थायलंडमध्ये डांबून ठेवले असून, त्याचा छळ करत त्याच्याकडून जबरदस्तीने ऑनलाईन फ्रॉडचे (सायबर गुन्हे) काम करून घेतले जात आहे. याप्रकरणी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील खेड (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी अनिकेत हरिश्चंद्र गरड (वय २२) या तरुणाने फेसबुकवर परदेशातील नोकरी संदर्भात एक जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीच्या आधारे त्याने संपर्क साधला असता, अज्ञात मोबाईल क्रमांक (८५६२०५२६७८९१५) धारकाने आणि त्याच्या साथीदार एजंटांनी अनिकेतला थायलंड देशात चांगल्या नोकरीचे आमिष दाखवले.
​१ मे २०२६ पासून अनिकेत हा आरोपींच्या संपर्कात होता. मात्र, थायलंडला पोहोचल्यानंतर आरोपींनी दिशाभूल करण्याच्या उद्देशाने कट रचून अनिकेतचे अपहरण केले. त्याला एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवण्यात आले असून, त्याच्याकडून जबरदस्तीने ऑनलाईन फसवणुकीची (सायबर फ्रॉड) कामे करून घेतली जात आहेत. तसेच त्याचा छळ केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
​भावाच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
​आपल्या भावासोबत परदेशात गैरप्रकार घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर, त्याचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर हरिश्चंद्र गरड (वय २५) यांनी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. ज्ञानेश्वर गरड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) ३ जुलै २०२६ रोजी पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारक आणि एजंटांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
सायबर पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२७(२), १२७(४), १४३, ३१८(४), ६१(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ (सी), (डी) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
​सोशल मीडियावरील परदेशातील नोकरीच्या आकर्षक जाहिरातींना नागरिकांनी बळी पडू नये. अधिकृत एजन्सी आणि योग्य पडताळणी केल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवून परदेशात जाऊ नये, तरुणांनो सजग आणि सावधान रहा. कुठल्याही भुलथापांना बळी पडू नका. त्वरित पोलिसांची संपर्क साधावा.असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india