Best News Portal Development Company In India

धाराशिव जिल्ह्यात तातडीने चारा छावण्या सुरू करा; आमदार प्रविण स्वामी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी मागणी !

धाराशिव जिल्ह्यात तातडीने चारा छावण्या सुरू करा; आमदार प्रविण स्वामी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी मागणी !
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत अल्प राहिल्यामुळे निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात तातडीने जनावरांच्या छावण्या (चारा छावणी) सुरू करण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी उमरगा-लोहारा मतदार संघाचे आमदार प्रविण विरभद्रय्या स्वामी यांनी राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
आमदार प्रविण स्वामी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाअभावी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील विहिरी, कूपनलिका आणि स्थानिक जलस्रोत पूर्णपणे कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर व उग्र बनला आहे.
या भीषण परिस्थितीचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातील बळीराजाला आणि त्यांच्या पशुधनाला बसत आहे. चारा व पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे शेतकऱ्यांना आपले पशुधन सांभाळणे अशक्य झाले असून, नाईलाजास्तव कवडीमोल भावाने जनावरे विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे.
मुख्यमंत्री नेहमीच शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने मार्ग काढत आले आहेत, हा विश्वास व्यक्त करत आमदार स्वामी यांनी सद्यस्थिती पाहता शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात शासनामार्फत तातडीने जनावरांच्या छावण्या मंजूर करून त्या सुरू करण्याची व्यवस्था करावी, अशी नम्र विनंती केली आहे.
या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन संबंधित प्रशासनाला तात्काळ पाठपुरावा करण्याचे आदेश द्यावेत, जेणेकरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व त्यांच्या पशुधनाला मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षाही आमदार प्रविण स्वामी यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india