नळदुर्ग पोलिसांची ओडिशाच्या नक्षलग्रस्त भागात मोठी कारवाई; १० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीतील मुख्य आरोपी गजाआड!
तुळजापूर प्रतिनिधी:- अबब सर्वात मोठी कारवाई
नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या १० कोटी ३८ लाख रुपयांच्या हशिश ऑईल तस्करी प्रकरणात धाराशिव पोलिसांनी मोठी कामगिरी फत्ते केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला ओडिशा राज्यातील अतिशय दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशा पहाडी भागातून स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने धाडसी मोहीम राबवून बेड्या ठोकल्या आहेत.
दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी रात्री नळदुर्ग पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलिसांना पाहताच तस्करी करणाऱ्या आरोपींनी कारमधून हशिश ऑईलची बॅग फेकून पळ काढला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून १० कोटी ३८ लाख २० हजार रुपये किमतीचे हशिश ऑईल जप्त केले होते. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच नाशिक-मालेगाव येथून दोन आरोपींना अटक केली होती.
या तस्करीचे धागेदोरे कोठून हलत आहेत, याचा तांत्रिक तपास पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तपासात प्रसेनजित खिरमहन दास (वय ३३, रा. ओडिशा) याचे नाव निष्पन्न झाले. मात्र, तो नेमका कुठे राहतो, कसा दिसतो याची कोणतीही ठोस माहिती पोलिसांकडे नव्हती. तो केवळ नावाने माहीत असल्याने त्याला शोधणे हे धाराशिव पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक ६ मे २०२६ रोजी ओडिशात रवाना झाले. तपासादरम्यान आरोपी हा ओडिशातील दुर्गम पहाडी आणि नक्षलग्रस्त भागात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. नक्षलवादी प्रभाव असलेल्या जनतापई या अतिशय धोकादायक भागातून ८ मे रोजी पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रसेनजित दास याला ताब्यात घेतले.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली.
पोलीस निरीक्षक: श्री. विनोद इज्जपवार (LCB)
सपोनि: श्री. सचिन खटके, पथक पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस हवालदार महेबुब अरब आणि रोहीत दंडनाईक यांनी पार पाडली. सध्या आरोपीला नळदुर्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, या आंतरराज्य तस्करीचे आणखी कोणाशी संबंध आहेत, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
सदरील कारवाई आपल्या धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांसाठी मान उंचवणारी आहे.या कारवाईमुळे धाराशिव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.






