कोणतीही पूर्वसूचना न देता जिप उपाध्यक्ष उषा गायकवाड यांची अचानक भेट.
आरोग्य यंत्रणेची मोठी तारांबळ.
उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. मात्र, आरोग्य सेवेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषाताई गायकवाड यांनी दिला.
उमरगा व लोहारा तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रांना कोणतीही पूर्वसूचना न देता जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा उषाताई गायकवाड यांनी उमरगा तालुक्यातील कळदेव लिंबाळा व लोहारा तालुक्यातील माकणी प्राथमिक आरोग्य केंद्रासह सालेगाव, लोहारा खुर्द व मार्डी येथील आरोग्य उपकेंद्रांना अचानक भेट देऊन पाहणी केली, तेव्हा आरोग्य यंत्रणेची मोठी तारांबळ उडाली. केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष उपस्थिती पत्रकाची तपासणी केली, तसेच औषध साठा आणि स्वच्छतेचा आढावा घेतला. “ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळणे हा त्यांचा हक्क आहे. अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांची गैरसोय होत असेल, तर ते सहन केले जाणार नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना सुनावले. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे हाच या आकस्मिक भेटीचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश हरिदास यांना संपर्क करून आवश्यक सूचना दिल्या. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. उपाध्यक्षांच्या या ‘सडन व्हिजिट’मुळे कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, सामान्य नागरिकांमधून मात्र या निर्णयाचे स्वागत होत आहे.






